मला भावलेला शांतताप्रिय कॅनडा : डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 21 (आज शेवटचा भाग: मिसीसागाचा निरोप घेताना)

*मिसीसागाचा निरोप घेताना*

तसे पाहिल्यास ही घाई घाईतची आणि कमी कालावधीची आमची ट्रीप आहे. येथे येऊन एकवीस दिवस होत आहेत आणि येथून आता शिकागो मुक्कामी जायचे आहे. हा प्रवास नायगारा फाॅल्स वरील ब्रिज वरून बायरोड करणार आहोत. 900 k m चे अतंर आहे. पहिला पडाव मिशीगण मधील हाॅटेलात होणार आहे.

जून 2018 मध्ये कॅनडात आलो होतो. नंतर करोना, लाॅकडाऊन अन् अशाच अनेक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बंधना मुळे जगच स्तब्ध झाले होते हे सर्वश्रुत आहेच आणि म्हणूनच ही ट्रीप आयोजित केली . शांतताप्रिय कॅनडा मला खूप भावतो, आवडतो. पहिल्याच ट्रीप मध्ये आम्ही खूप भटकंती केली. माझ्या सवंयी प्रमाणे कॅनडा विषयी प्राथमिक माहितीचे टीपण काढले. लोकात, शेजारी, गार्डन मध्ये, वाॅक घेताना, निरीक्षणातून माहितीचे कण वेचीत गेलो.

संभाषणातून संस्कृतीचे आदानप्रदान समजत गेले आणि मग जे जे आपणासी ठावे ते सख्या सोबती, मैत्रिणी, मित्रमंडळींबरोबर शेअर करावे माझ्या आनंदात सहभागी करून घ्यावे याच एका प्राजंल भावनेतून लिहीत गेलो. तुम्हां सर्वाकडून चांगलाच प्रतिसाद मिळत गेला. माझा हुरूप वाढला आणि गेले एकवीस दिवस मी लिहीत राहिलो. मी विविध विषयांवर सातत्याने लिहू शकलो याचे मलाच आश्चर्य वाटत आहे. आणि आता मिसीसागाचा निरोप घेत आहे.

भावनात्मक भाग सोडा, पण कॅनडातील राहाणीमान, जीवनशैली, जगभरातील नागरिक येथे येऊन शांतपणे सलोख्याने जीवन व्यतीत करीत आहेत. येथे शिक्षणाची संधी , प्रत्येकाला वैयक्तिक प्रगतीची सुसंधी त्यामुळेच येथे येणार्‍यांचा ओढा अधिक आहे.

असो. मला जेव्हढे आकलन झाले ते सांगितले.ते हिमकण समजा.बाकी सर्वच ठाक ठिकच.तर बाय बाय मिसीसागा,बाय कॅनडा,आणि बाय बाय नायगारा फाॅल्स.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.

डाॅ.भास्कर धाटावकर