
*मराठी भाषिक मंडळ टोरोंटो*

मराठी माणुस जगाच्या कुठल्याही देशात किंवा आपल्याच मायदेशातील इतर प्रातांत जरी गेला तरीही चार पाच जण एकत्रित आले कि तो प्रथम आपली संस्कृती जपण्यासाठी व ती व्यक्त करण्यासाठी मंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न करतो.मग कोणी नाटक वेडा आपल्या सारख्या नाट्यप्रेमींचा संघ जमवतात. कोणी आपले सणवार,त्यामागील भावनात्मक भाग जपण्या साठी मंडळाचा व्यासपीठ तयार करतात. मी आतापर्यंत तीस एक देशांना भेटी दिल्या आहेत, तेथे तेथे आपल्या मायदेशातील मराठीची अस्मिता जपण्या साठी एरव्ही खडूस पणा करणारा किंवा फटकल पणे वागणारा मराठी माणूस परदेशात गेल्यावर हलवा होऊन एक दिलाने मंडळाशी एकरूप होऊन जात असतो.
2018 च्या जून मध्ये मी आणि उषा मिसीसागात आलो होतो तेव्हा मराठी भाषिक मंडळाच्या एक दिवसीय पिकनिक मध्ये सहभागी झालो होतो. अस्मादिकास शिव प्रभुविषयी बोलण्याची संधी मिळाली होती.
येथे मंडळाचे नाव टोरांटो असले तरी इतर शहरातील मराठी नागरिक सदस्य होऊ शकतो. त्यासाठी फीज नाही. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते आणि तुम्ही काही डाॅलर रक्कम आगाऊ जमा केली तर मंडळा मार्फत जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये घसघशीत सवलत मिळते. काही जण प्रायोजक म्हणून पुढे येतात त्यांना आप आपल्या व्यवसायाची जाहिरात करता येते. येथे मराठी बांधव धंद्यात *पडत* नाही तर यशस्वी पणे दौडतो हा सुखद अनुभव आहे.
गणपती सकल मराठी जणांचे आराध्य दैवत. त्यासाठी एकत्र येणे आलेच. मग गणेशोत्सव सारखा दुसरा मराठी मनाला भावणारा सण असू शकतच नाही.किती तरी अगोदर नियोजन केले जाते. नाटक प्रेमी नाटक बसवितात. कसेही करुन तालमी होतात. सांस्कृतिक कार्यक्रम ठरले जातात. प्रत्येक जण आपल्या अंगच्या कलागुणांना प्रकट करण्याची संधी घेतात आणि देतातही. बाप्पाला मोदकाची आवड, ती पुरविण्यासाठी भगिणी पुढाकार घेतात . मराठ मोळ्या पदार्थांची कोणतीही उणीव ठेवत नाही. प्रत्येक जण स्मरणरंजनात रमून जातो. दिवाळीचा सण बर्फाच्छादित दिवसामुळे होत नाहीत पण इतर कार्यक्रम होतच असतात.
या एकत्रित होणाऱ्या कार्यक्रमा मुळे ओळखी होतात, एक मेघांना भावनिक आधार मिळतो. सुप्त गुण सादरीकरणाची संधी मिळत असते आणि हे गुण्यागोविंदाने चालते इतकेच नव्हेतर नवागतांना मार्गदर्शक ठरते ,गरज पडल्यास मार्गदर्शनही केले जाते.
कधी कधी खास म्हणून मराठी पदार्थांचे स्टाॅल लावले जातात. अशा प्रकारच्या स्नेह संमेलनातून तरूण, तरूणींना भेटण्याची संधी मिळते.थोडक्यात लग्न उस्तुक मंडळींना स्कोप मिळतो. टोरांटो मधील मराठी भाषिक मंडळाचे कार्य खूप कौतुकास्पद आहे.अभिनंदनीय आहे.त्या सर्वच मंडळाच्या यशासाठी झटणाऱ्या पदाधिकारी,आयोजक व सदस्यांना माझा मानाचा मुजरा!
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











