
आजची भेट विंडी सीटीला
सकाळीच घाईघाईत मी तयार झालो होतो.प्रथम रेल्वे स्टेशन पर्यंत कारने तेथून पेट्रा रेल्वेनी डाऊन टावूनला जाण्याचे ठरले होते पण शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने ट्रेन एक तासानंतर धावणार होत्या मग आम्ही कारनेच विंडी सीटीला जाण्याचे ठरविले नि ड्राईव्ह सुरू झाला.
आता ही विंडी म्हणजे दुसरे तिसरे कोणतेही नवीन ठिकाण नसून जेथे आभाळाशी स्पर्धा करणार्यां इमारतीचे शहर असे म्हटले जाते त्या शिकागोतील सर्वात उंच विलीस इमारती जवळ पोचलो.घरून निघतानाच पार्किंग स्लाट बुक केल्याने आज काही अडचणच आली नाही.

या पॉईंट वरून आम्ही बीग बस मध्ये प्रवेश केला आणि बसच्या टाॅपवर छत नसलेल्या पण आरामदायी आसनावर स्थानापन्न झालो. एअर फोन वरून प्रत्येक स्थळाची माहिती देत आमची बीग बस चालत होती. हाॅप ऑन आणि हाॅप ऑफ बस मध्ये तुम्हाला जे ठिकाण पहायचे असेल तेथे उतरून पाहू शकता. प्रत्येक पंधरा मिनिटात दुसरी बस येते त्या बस मध्ये तुमच्या इच्छेनुसार दुसर्या स्पाटला जाऊ शकता. मी ही बीग बस हाॅप ऑन हाॅप ऑफ बस सेवा प्रथम दुबई, आबूधाबी मध्ये त्यानंतर लंडन मध्ये जपान मधील टोकीयोत एन्जॉय केली होती.

स्लायडेक विलीस टाॅवर वरून आम्ही मिलिनियम पार्क, द आर्ट इन्स्टिटय़ूट, ग्रंथालय पार्क, म्युझियम कॅम्पस् ,नेव्ही पिअर,वाॅटर टाॅवर, ही शिकागोतील सर्वात 1864 मधील जुनी दगडी इमारत त्यावेळी भीषण आगीतून वाचली होती तेव्हा शिकागोतील तीस टक्के इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी स्वाहा झाल्या होत्या.

या चिक फिल ए या मॅकडोनाल्ड सारखाच चेन असलेल्या रेस्टॉरंट मध्ये चिकन बर्गरचा आस्वाद घेऊन थोडी विश्रांती घेतली.
पुन्हा बीग बस मधून मिशीगण तटावरील असंख्य लहरी निरखीत, अंगावर बोचरे वाऱ्याचा मारा सहन करीत तेथे उसळलेला प्रचंड जनसागर, सागरतटी जलक्रिडाचे अनेक अविष्कार, कित्येक छोट्या मोठ्या बोटी शिस्तबद्ध पध्दतीने नांगरून उभ्या,सर्वत्र उत्साही,जल्लोषाचे वातावरण,कुठे संगीताचे कर्णमधुर स्वर,तर कुठे ब्रेक डान्स, कसरतीचे प्रयोग. ज्याला जे भावते, झेपते, सोसते ते ते एन्जॉय करण्याची पूर्ण मोकळीक. येथे या वयात, किंवा तुम्हाला शोभते का असे विचारायला कोणीच जात नाहीत.
शेवटी मिलिनियम पार्क मधील *बीन* ह्या शिकागोचा आयकॉन ठरलेल्या ठिकाणी फोटोग्राफीचा आनंद घेतला.ज्या प्रमाणे मुंबईत गेट वे ऑफ इंडीया,हैदराबादचा चार मिनार, दिल्लीचा इंडीया गेट,आग्र्याचा ताजमहाल त्याप्रमाणेच हा *बीन* शिकागोची ओळख असलेले ठिकाण आहे.

अशी ही अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट देत त्यांच्या आठवणी कायम राहाण्यासाठी छायाचित्रण सुरू होतेच.
मध्येच अतिविशाल माॅल्स मधील विंडो शाॅपींग, एका चारमजली काॅफी शाॅप मध्ये उसळलेली गर्दी पाहून आम्ही काढता पाय घेतला.येथे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीचा बावीस मजली फाईव्ह स्टार हॉटेल पाहिले. संपूर्ण अमेरिकेत त्यांच्या हाॅटेलची चेन असल्याचे समजले.

मला भावली ती शिकागो नदीतून करण्यात येणारी क्रुझ वरील सैर होय. या नदीवर अनेक मजबूत लोखंडी पुलांचे जाळेच आहेत. नदीच्या दुर्तफा आकाशाशी स्पर्धा करणार्यां गगनचुंबी इमारतीचे विशेषत: विलीस टाॅवरचे आर्किटेक्चर वैशिष्ट्ये काय आहेत ते फार बारकाईने सांगितले जाते. जगभरातील वास्तुविशारद शास्त्राचे विद्यार्थ्यांची याठिकाणी स्टडीटूर आयोजित केली जाते. सलगपणे हे सर्वच पाहाताना, भव्य पार्कस् तसेच ऐतिहासिक वाॅटर सर्वीस विभागाची इमारत सारे डोळ्यात साठवून ठेवत होतो. शेवटी विंडी पाॅईंटवर सेल्फी काढून परतीचा प्रवास सुरू केला.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











