सफर शिकागोची: विलो पार्क आणि इंडियन पब्लिक ट्रेल्स लायब्ररीचा निरोप घेताना…. – डॉ भास्कर धाटावकर – भाग 18

विलो पार्क आणि इंडियन पब्लिक ट्रेल्स लायब्ररीचा निरोप घेताना….

आज उषाने वाॅलमार्ट मध्ये जाऊन काही खरेदी केली. मी जाणे टाळले.त्याची प्रमुख कारणे म्हणजे तिची खरेदी लवकर आटोपत नसते आणि तेव्हढा वेळ थांबून राहाण्याचा माझा संयम संपतो.बरे ती प्रत्येक खरेदी केलेल्या वस्तूंचा भारतीय चलनात किती किंमत झाली,त्यावर जी एस टी,टॅक्स किती लावला याची आकडेमोड करते,याविषयीही माझी काहीच हरकतही मुळीच नसते आणि नाही.पण माझ्यावर ही गोळाबेरीज करावयास लावून माझे गणिताचा ज्ञान समस्त खरेदीसाठी आलेल्यांच्या समोर उघडे करते याचीच मोठी भिती वाटते.

मी आज इंडियन पब्लिक ट्रेल्स लायब्ररीस धावती भेट दिली.अत्यंत अल्प काळात झालेल्या परिचितांना फक्त हाय,हॅलो बोलण्यासाठी.तेथील एक सहाय्यक मुळची भारतीय तिचे आभार मानून त्या ग्रंथालयाच्या वास्तुचा निरोप घेऊन विलो पार्कमध्ये आलो.

Chicago : Newly renovated Indian Trails Library

येथील विस्तीर्ण मैदानावर शाळकरी मुलां मुलींची प्रचंड गर्दी जमली होती.चार, पाच फूटबॉल मैदाने आखण्यात आली होती त्याचे शिक्षक किंवा कोच त्यांच्याकडून फूटबाॅलचे धडे गिरवून घेत होते.मुले तल्लीन होऊन गेली होती. इतके दिवस असे दृश्य दिसले नव्हते. पण आता शाळा सुरू झाल्यापासून त्यांना अभ्यासक्रमा व्यतिरिक्त खेळांसाठी वेळ द्यावाच लागतो म्हणून आज येथे आणण्यात आले होते.तसे प्रत्येक शाळेत सुसज्ज खेळाच्या प्रकाराची मैदाने असतातच.आज *अवनी ,नीवाला शाळेचा दिवस कसा गेला विचारल्यावर त्या म्हणाल्या आजोबा तीन कि.मी.मॅरेथॉन करावयास लावली* असे सांगितले.

विलो पार्क मधील मुलां साठीच्या विभागात नेहमीच्या बाकावर बसलो.येथे हमखास गाठीभेटी होतात. पण आज फारसे कोणी भेटले नाहीत.जे परिचित होते त्यांचाही भावपूर्ण निरोप घेतला.

त्यानंतर हेडफोन लावून लतादिदींच्या अजरामर अमीट गोडीच्या स्वरांचा आनंद घेऊन माझा वाॅकचा कोटा पूर्ण केला. या धावपळीत काल अनुप देशमुख माझे मित्र अजित देशमुख यांच्या पुतण्याच्या घरी डिनर साठी भेट दिली.भरपूर अगत्याने आणि प्रेमाने पाहुणचार केला,त्यांची लाडली अक्षरा सौ दीप्ती,आणि अंजली वहिनी यांच्याशी येथील मराठीजनांना लागणार्‍या वस्तुंची माहिती मिळाली.

शुक्रवारी उषाचा भाचा मनीष भोईर याच्या कडे भेट दिली. या भेटीत कौटुंबिक गप्पा छानपैकी रंगल्या होत्याच. सौ.मुक्ता, त्यांच्या दोन गोड मुली मृदा आणि मैथीलीची माझी दोस्ती लगेच जमली. शनिवारी पारूल आणि राहुलनी कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करून काही निवडक मित्रांना आमंत्रित करून डिनर साठी बोलावले होते. पारूलने स्वता: रुचकर पदार्थ बनविले होते त्यांचा सर्वानी आस्वाद घेऊन गप्पांची मैफल जमविली होती. अवनी नीवाने पियानोवरील आपली कौशल्य दाखवून वाहव्वा मिळविली.या धावत्या भेटीत सर्वांशी भेटी घेणे शक्य नव्हते त्यामुळे काहींशी फोन वरून तर काहींना पुढील शिकागोतील भेटीत तुमच्याकडे नक्कीच येतोच असा शब्द दिला आहे.डाॅ.सर्जेराव न्यूजर्सीत! येथून खूपच दूर. त्यांच्याशी फोनवरून सुसंवाद चालूच होता आज त्यांचाही फोनवरून निरोप घेतला.

संध्याकाळी राहुलच्या घरी परतायला अमंल उशीरच झाला होता.मी मात्र या सदैव जीवंत वाटणार्‍या आवडत्या स्थळांचा निरोप घेतला होता.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन