
शिकागोतील फॅशन आऊटलेटस् माॅलला दिलेली भेट आणि भेटलेले हायफाय पंडीत !
आज राहुलने आम्हाला त्याच्या बफेलो ग्रोव्हच्या घरापासून 65 कि.मी.दूर असलेल्या शिकागोतील फॅशन आऊटलेट माॅल मध्ये काही खरेदी साठी विशेषत: कपडे घेण्यासाठी नेले.हे अतंर आम्ही पंचेचाळीस मिनिटात पूर्ण केले.जाताना सुंदर इमारती, त्या ठिकाणी पाणी अडवा, आणि पाणी जिरवा यासाठी निर्माण केलेली तलाव,हरितभरीत हिरवळीवर कलात्मक रित्या लावलेली फुलांचे ताटवे.हे पाहात गेल्याने थोडा उशीरच झाला होता.

या फॅशन आऊटलेट माॅल ची निर्मिती वीस वर्षांपूर्वीच करण्यात आली. शिकागो परिसरात बांधण्यात आलेले पहिले परिपूर्ण डिझायनर आऊटलेट माॅल आहे.या ठिकाणी 130 प्रकारचे निरनिराळे स्टोअर्स आहेत ते सुध्दा खुप मोठ्या साईजचे. यावरून तुम्ही या माॅलच्या भव्यतेची, विशालतेची कल्पना करू शकता.
या माॅल साठी 530 000 चौरस फूट जागेचा वापर करण्यात आला आहे. सारी रचना वास्तुविशारदानी आपले सारे कौशल्य पणाला लावून कलात्मक पणे निर्मिती केली आहे.
सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सांयकाळी 7 पर्यंत हे माॅल उघडे असते.करोनाच्या काळात येथील वेळेत खुपच कपात केलेली आहे.सदरचा माॅल टी.एस.ए.या कंपनी प्रमाणित द्वारा चालविण्यात येतो.
उषाने तिच्या आवडीनुसार लेडीज गारमेंट सची, तर माझ्यासाठी राहुल नी गरम जॅकेटची, चेतन करीता टी शर्ट घेतले.इतर विभागात जाई पर्यंत वेळ संपल्याने सर्व स्टोअर्स धडाधड बंदही झाले.
येथे स्थानिक कलाकारांच्या कलात्मक वस्तुचा,त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कलाकृती,पेंटींग्ज, फॅशन संबंधित बाबींचे प्रदर्शन आयोजित केले जातात त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो.येथे ललनांचे फॅशन शो,तसेच संगीताचे कर्णमधुर कार्यक्रमही आयोजित केले जातात.
हे फॅशन आऊटलेट माॅल ओहारे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे.तेथून डाऊन टाऊन मध्ये जाण्यासाठी नियमित शटल सेवाही उपलब्ध आहे.
या आऊटलेट माॅल मध्ये प्रत्येक स्टोअर्स मध्ये कोणत्या प्रकाराची मटेरियल मिळते त्याची व्यवस्थित माहिती दिलेली असते. ह्या संपुर्ण माॅलच्या स्टोअर्सना भेट देण्यास किती दिवस लागतील याचा हिशोब करीतच आम्ही तेथून बाहेर पडलो.
अमेरिकेत हिंदु मंदिरांची काहीच कमतरता नाही. येथील शाभ्मर्क एरियात मराठी लोकांची, त्यापेक्षाही गुजरातींचीही संख्या जास्तच आहे. येथील पटेल स्टोअर्स मध्ये सर्वच गोष्टी उपलब्ध होतात.पुजेचे साहित्य, नारळ, सुपारी ते ग्रोसरी, सणानुसार लागणारे भारतीय परंपरेनुसार ड्रेस इतकेच काय नलींचे साड्यांचे दुकानही तेथे आहे. आपण मुंबईतल्या गुजर बहुल भागातच आहोत अशीच फिलिंग येते.
येथील हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे.हनुमानाची उंच मुर्ती आकर्षण आहे.तशी अनेक मंदिराची रेलचेल आजूबाजूलाच आहे.
याठिकाणी एक तरुण जोडपे भेटले. त्यांनी हात जोडून नमस्कार म्हटले, कोणत्या धार्मिक विधी साठी पंडीत हवाय याची चौकशी केली.मला ते एकदम इंटरेस्टिंग वाटले. त्यांनी हातामध्ये त्याचा व्हिजिटिंग कार्ड्स ठेवला.
या कार्ड्स मध्ये नामकरण, शाॅवरबाथ, सत्यनारायण कथा,वास्तुशांती, नवग्रह शांती, वास्तुदोष निवारण, जन्म कुडंळी, सर्व प्रकारचे मुहूर्त, लग्न गुणतालिका जुळते कि नाही नसल्यास त्यावरील उपाय योजना, लग्न विधीचे सर्व प्रकार, लग्न लावणे ,त्यानंतर मृत्यू संबंधित सर्व विधी आणि जोडीला ज्योतिष शास्त्राचा तो अभ्यासक असल्याने प्रत्येक अडचणीवरील मार्गदर्शकही होता. एका माणसाच्या अंगी किती गुणवत्ता ठासून भरली होती? मी त्यांनी दिलेल्या कार्ड्स कडे आणि त्याच्याकडे आळीपाळीने सस्मित नजरेने पाहात होतो.
अधिक चौकशी अंती तो आणि त्याची सहाय्यक धर्मपत्नी दोन्ही उच्च विद्याविभूषित शिकागोतील आय.टी.सेल मध्ये काम करीत होते. तिसी, पस्तीशी मधील जोडपे होते.येथे धार्मिक विधी पार्टटाईम लोकसेवा भावनेतून भरपूर अमेरिकेन डाॅलर घेऊन ते दोघेजण करीत होते.असे अनेक पंडीत तेथे उपलब्ध होते. लोक नवीन कार घेतली कि तिला सुरक्षतेची कवचकुंडळे अमेरिकेतील देवांकडून घालायला लोक उत्साहाने येत होती.हे ऐकून आणि पाहून मेरा भारत महान याची प्रचिती मला तात्काळ आली.हे उच्च श्रेणीतील पंडीत गुजरातच्या अहमदाबाद मधील होते.
असो.जाता जाता आम्ही स्वामी नारायण मंदिर पाहाण्यास जाणार होतो.ते पण भव्य दिव्य मंदिर आहे.स्वामी नारायण मंदिरे निटनेटकी भव्य असतात आणि त्यांचे व्यवस्थापनही उत्तम असते.पण वेळेअभावी ते शक्य झाले नाही. घरी आलो. बॅगा भरायला घेऊन हा मुबंई कडे निघण्या पुर्वीचा लेख पुर्ण केला.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











