
शिकागोला बाय बाय करून व्हाया म्युनीच मार्गे मुंबईकडे प्रयाण
आता बॅगाची आवरा आवरी केव्हाच सुरू झाली होती. माझी नेहमीप्रमाणेच सर्व प्रथम तयारी झालेली असते.अगदी अखेरचा दंडवत सारखी भावास्था झाली नसली तरी मनामध्ये हुरहुर वाढली होती.गेल्या पंचेचाळीस दिवसा नतंर आमच्या प्रिय नाती अवनी आणि नीवा यांना निरोप घेण्याची वेळ आली,राहुल, पारूल यांनी सर्व सामान,सोबत आणलेली पुस्तके,नोटस् कपडे, औषधे,इंजेक्शन घेतली आहेत कि नाही याची पुन्हा पुन्हा खात्री करीत होते. येताना बॅगा टम्म होत्या परताना त्यांची जाडी जुडी कमी होऊन त्या योग्य सेप आणि वजना मध्येच आल्या होत्या.त्यांच्याही प्रवासातील अनेक सुचना मिळत होत्याच. त्यामुळे मनाची घालमेल सुरू झाली होती.माझ्या सारखीच उषाचीही अवस्था होती.मुलांना शेष आशीर्वाद देताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याच.
शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आमचे सांयकाळी सहा वाजता फ्लाईट असल्याने राहुलने आम्हांस तीन वाजताच सोडले.चेक इन करण्यापूर्वीचा नमस्कार झाल्यावर आम्ही सर्व इमिग्रेशनचे सर्व सोपस्कार पूर्ण करून विमानतळावर आत प्रवेश केला.
आमच्या विमानाने वेळेनुसार आकाशी झेप घेतली. हवाई सुंदरीच्या प्रात्यक्षिका सहित सुचना झाल्या.आणि आमच्या विमानाने आकाशी झेप घेतलीआणि माझ्या डोळ्यासमोर गेल्या पंचेचाळीस दिवस कॅनडा आणि अमेरिकेतील शिकागोत घालविल्या दिवसांचे चलत चित्रपटच सरकत राहिला.येथे भरपूर फिरलो.येथील जीवन प्रणालीचा आनंद घेतला.अवनी नीवाचा मासूम पणा गेलाय,मोठ्या होऊ लागल्यात तरीही त्यांचा लाघवीपणा कायम आहे.काही वेळातच खानपान सेवा सुरू झाली आणि त्यानतंर *पेयपान* सुरू झाले होते.
मी आमचे विमान कोणत्या आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाने जात आहे ते पाहात होतो.उषाला विंडो सीट मिळाली म्हणून ती खुश होती.मी हिंदी चित्रपट पाहाण्यास सुरुवात केली.मध्येच गेल्या दिडएक महिनाभर केलेला प्रवास, त्याची काढलेली टिपणे आठवित होतोच.मी जे जे पाहिले ,अनुभवले त्याविषयीची सतत पंचेचाळीस दिवस लेख मालाच लिहून मित्रांबरोबर शेअर केली.अशा विचारात मग्न असताना डोळ्यांत निद्रादेवीने प्रसन्न होऊन कधी प्रवेश केला समजलेच नाही.आणि आमचे विमान जर्मनीतील म्युनीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅड झाले.

आता म्युनीच मधील जर्मनीच्या वेळेप्रमाणे सकाळचे दहा वाजले होते.पुन्हा इमिग्रेशनची औपचारिकता पूर्ण करून मुंबईकडे येणाऱ्या विमान प्रवेश द्वाराजवळच्या प्रतिक्षा कक्षात बसून राहिलो.येथे आमच्या प्रवासातला छोटासाच दोन तासाचा ब्रेक होता.मी फ्री ड्युटी शाॅपींगवर नजर टाकीत होतो.
कॅनडा नि अमेरिकेतील सुबत्ता ,सुखसोई सर्व काही होतेच, राहुल, पारूल दोघेही कामात,त्यातच मिसीसागातील आणलेल्या सामानाची मांडणी, नव्या निवासस्थानी पुन्हा सर्वच गोष्टीचा श्रीगणेशा,अवनी नीवाचे नवीन शाळा प्रवेश यामध्ये व्यस्त असूनही त्यांनी आम्हांला फिरवले साइटसियींग घडविले ती त्यांची धडपड आठवली.कारण येथे कार शिवाय जाणे अशक्य, मात्र बाहेर पडल्यावर सर्वत्र हिरवळ,बोचरी थंड हवा,निरव शांतता जणु काही 144 कलमच लागू आहे.सर्व काही चार भिंतीच्या आंतमध्ये.थोडी हालचाल बॅकयार्ड मध्येच. टूमदार आकर्षित करणारी घरे,पण सदोदित बंद, सकाळ,संध्याकाळ न चुकता श्वानास फेरफटक्यासाठी नेणे,माॅल्स मधून हवे ते ट्रालीत भरून त्यांचे काऊंटरवर पेमेंट करून कारमधून भरपूर आवश्यक ते किंबहुना वाजवीपेक्षा जास्तच खरेदी करणे हे नजरेसमोर येतच राहिले.एव्हढ्यात आमचे विमान म्युनीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅड झाले.
म्युनीच जर्मनीतील एक महत्वाचे ऐतिहासिक शहर. भव्य इमारतीचे,सर्वात मोठ्याल्या गगनचुंबी अशा चर्चेसचे ,पॅलेसचे, विस्तीर्ण मैदानांचे शहर.या शहरापासून जवळच हिटलरने छळछावण्यातून मानवतेला कालीमा फासणारी कृती करून ज्यु धर्मींयाचा अमानुष छळ केला होता.त्या काळ्याकुट्ट आठवणीचा करूणाकारक इतिहास सांगणारे तेथील गॅस चेंबर्स मी युरोपच्या टूर्स मध्ये जे जे पाहिले आठवित राहिलो.

अशीच एक भयानक घटना या म्युनीच मध्ये खेळ जगताला हादरून सोडणारी दु:खद बाब म्हणजे 1972 साली येथे आयोजित केलेल्या ऑलिम्पिक मध्ये घडली होती.
इस्त्रायलमधील अकरा खेळाडूंची निर्घृण हत्या झालेल्या त्या घटनेने जग हादरून गेले होते त्या युरोपियन टूर्स मध्ये मी म्युनीच शहरास भेट दिली होती. त्यावेळेस उभारण्यात आलेली ऑलिम्पिकनगरी, तेथील सर्वच खेळ प्रकारा साठी उभारण्यात आलेली क्रीडांगणे,तरणतलाव, खेळाडूं साठी केलेली निवासव्यवस्था इत्यादीची पाहाणी केली होती.आजही तेथे त्या ऑलिम्पिक नगरीचा सुंदर जतन करून ठेवून तेथे स्पर्धा आयोजित केल्या जातात. खूप सुंदर, अप्रतिम कलात्मक ऐतिहासिक इमारती असलेले हे शहर आर्वजून पाहावे असेच आहे.येथे दरवर्षी बियर महोत्सव आयोजित केला जातो.जो एकावेळेस जास्तीत जास्त बियर पिणार त्याला सन्मानाने गौरविण्यात येते.
असो. मी कुठेही स्मरणरंजनात रमून जातो. तोपर्यंत आमच्या मुंबईत येणाऱ्या विमानाने आकाशी झेप घेतली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वेळेनुसार रात्रीचे अकरा वाजून गेले होते. आमच्या विमानाची चाके धावपट्टीवर विसावली होती. मी माझ्या मुंबई नगरीत आलो होतो. बेल्ट पट्टय़ावरून आमच्या बॅगा घेऊन विमानतळाबाहेर पडलो.चेतन आणि कांचन आम्हांस घेण्यासाठीआलेच होते. दोघेही आनंदाने भेटले आणि आम्ही आमच्या खार पश्चिमेच्या कल्पक बिल्डिंगकडे प्रवास सुरू केला.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.











