राज्यातील आठ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात, टी ई टी अनुत्तीर्ण झालेल्या विरोधात सेवा समाप्ती कारवाई

मुंबई: राज्यातील सुमारे आठ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली असून, त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. कारण, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांविरोधात सेवा समाप्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 

नियमानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण परिषदेने निश्चित केल्याप्रमाणे ३१ मार्चपर्यंत उत्तीर्ण होणे गरजेचे होते. पण, राज्यातील सुमारे ८ हजार शिक्षक अद्याप उत्तीर्ण झालेले नाहीत. त्यातच राज्य सरकारने टीईटी उत्तीर्ण होण्याबाबत अतिरिक्त संधी देण्याची विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली होती. मात्र राज्य सरकारची ही विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ३ जून २०१९ ला फेटाळून लावली आहे.

त्यामुळे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांवर २४ ऑगस्ट २०१८च्या शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश २५ नोव्हेंबरला दिले होते. त्यानुसार अखेर आता टीईटी अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांविरोधात सेवा समाप्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. जगताप यांनी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय उपसंचालक, प्राथमिक-माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

खासगी संस्थांनी संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त न केल्यास, त्यांचे वेतन १ जानेवारीपासून शासनाकडून दिले जाणार नाही.