त्यांना जीवन कळले हो, स्वानंदात ते रमले हो!

त्यांना जीवन कळले हो, स्वानंदात ते रमले हो!

सांयकाळी उषा आणि मी रिक्षा पकडून काॅर्टर रोडला कित्येक वर्षानी फिरावयास गेलो.शिकागोतील एकत्र वाॅक घेण्याची नाही म्हटली संवय झालीच होती आणि माझी घरातच बसून राहाण्याची आदतही बदलण्याची मी स्वतःहून संकल्प सोडला होता.

आम्ही वाॅक सुरू केला.गर्दी फुलून गेली होती. समुद्राला ओहोटी होती पण येथे आलेल्या सर्वाच्याच आनंदाला भरती आली होती.तो जल्लोष त्यांच्या चेहर्‍यावरून वाहताना स्पष्ट दिसत होता. खारट हवा सुटली होती. खारदांड्याच्या बाजूने विशिष्ठ वास नाकात शिरत होता. गेली तीन साडेतीन वर्ष इकडे आलोच नव्हतो. लाॅकडाऊन मुळे सर्व बदंच होते अन् त्यानंतर माझं उद्भवलेला गंभीर आजार! ही त्याची प्रमुख कारणे होती.

आम्ही पोलीस चौकी पॉइंट पासून चालावयास सुरुवात केली. खूप कालावधीच्या गॅप नंतर परिचित ठिकाणही काहीसा नव नवा वाटत असतो अशीच माझी भावना झाली होती. थोड्याच अंतरावर असलेल्या कलाकारां साठी तयार करण्यात आलेल्या चौथर्‍यावर, तेथील पायर्‍यांवर काही तरुण मंडळी आपली सांगीतिक कला सादर करीत होती. कोणी अमेरिकेन सॅमअकंलच्या वेशात निश्चल उभे राहून इतरांसाठी सेल्फी पॉइंट झाले होते. त्याच्या अदाकारीस खूश होऊन त्याच्या डब्यात पैसे टाकले तो लवून धन्यवाद देत होता. युरोपियन देशात अन् अमेरिकेत असे जागोजाग निरनिराळी वेशभूषा करून उभे असतात. किंचित पुढे फक्त श्वाना साठीच असलेले बंदिस्त उद्यान. तेथे श्वान मालक नि चालक आप आपल्या श्वानाच्या बिरादारीची गळाभेट, ख्यालीखुशाली किंवा थोडासा माफक रोमान्स करायला परवानगी देत होते. आणखीन थोडे बालबच्चे कंपनीचा विभाग. हा पुर्णता एकदम चिकार हाऊसफुल्ल . कोणी कानात हेडफोन लावून संगीताचा आस्वाद घेत होते. तर कोणी हातात हात घेऊन, कोणी घामाघूम होऊन धावत होते, कोणी गांवाकडून आलेल्यांना पाहुण्यांना मुंबापुरीची माहिती त्यांच्या कुवतीनुसार सांगत होते. तिथं बगा राजेश खन्नाचा आशीर्वाद बंगला होता. हे चुकता न विसरता सांगत होते. ऐकणारी आ वासून ऐकत तोंडाचा चंबू करून, विस्फारून, डोळे मोठे करून खन्नाला स्मरून होते.*लयभारी**बोलत होते. दोन्ही बाजूच्या बाकड्यावर कोणी आपल्या प्रियकराच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकून दुनिया गयी….या भावविश्वात. तर कोणी लालाजी, पापाजी, आजी आपल्या गत आयुष्यावर बोलू काही या मोडमध्ये. कोणी तरुण मंडळी दूरस्थ खडकात समाधीस्थ अवस्थेत तर कोणी मावळत्या भास्करास निरोप देत होता.थोडक्यात जो तो आपल्याच आत्ममग्नात दंग होता.

माझे हे चालण्यापेक्षा निरीक्षणच जास्त होते म्हणून उषा पुढे चालत गेली होती.एव्हढ्यात एका तालासुरातील स्वर कानावर पडले. मी तिकडेच थोडा वेग वाढवून पोचलो. फारसा नाही. मनाची तेथे पोचण्यासाठी गती वाढली होती तेथे गेलो. उषा तेथेच थांबून राहिली होती.

एक अदांजे चौदा पंधरा जणांचा तरुण मुलांमुलींचा ग्रुप चर्मवाद्ये कोंगो, तबला,डफली,झांज,अनेक प्रकारची वाद्ये रिदम मध्ये वाजवित होती.त्यावर अनेक जण आपले वय विसरून आनंदात धुंद होऊन बेभानपणे नाचत होते.काहीजण टाळ्या वाजवत प्रतिसाद देत होते. येणारे जाणारे तेथे थांबून दाद देत होते. तालासुर टिपेला पोचले होते. त्याचवेळेस गर्दीतून वाट काढत एक व्हीलचेअर वर बसलेल्या आजीबाईना ढकलीत तिच्या सेविकेने तिला पुढे आणली.

काही क्षणातच आजीच्या अंगात तो वाद्य, नृत्य, टाळ्यांचा रिदम भिनत गेला आणि आजीबाईनी व्हीलचेअर वरूनच दोन्ही हात उंचावून बल्ले बल्ले पोझिशन मध्ये सहभागी झाली. तिला उस्फूर्तपणे दाद मिळाली. आता बघेही सामील झाले होते. मस्तच गोपाळकाल्ला वाढला होता तो निस्मिम आनंदाचा क्षण. सर्वच ताणतणाव विसरून फक्त जीवनातील आनंदाचे क्षण लुटत जगण्याचा होता. अवघे रंगुनी रंगांत असेच काही. मी स्वत: तल्लीन होऊन गेलो. माझेही पाय नकळत थिरकत होते.

आता आजीबाई थांबल्या. प्रसन्नतेची प्रभा त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट विलसली होती.तिने त्या मुक्तपणे आनंद देणाऱ्या आणि घेणाऱ्या कलासक्त मंडळीच्या हातांचे चुबंन घेतले.काहीनी या क्षणाचे व्हिडिओ काढले तर काहीनी सेल्फी!

मी स्वत:लाच प्रश्न विचारला.आपण लाॅकडाऊनचे सोडा पण त्याच दरम्यान उद्भवलेल्या गंभीर आजारानंतर आता संपत आले असे का समजत राहिलो आहोत? अजून अर्धा पेला रिक्त झाला असे न समजता अर्धा पेला शिल्लक आहे या स्पिरीटने का घेतले नाही? साधीशी गोष्ट, मला शिकवून गेलीच असे म्हणण्यापेक्षा मनाला फार मोठी उभारणी मिळाली. मनं पुलकित झाले.अंर्तयामी एक नवीन उर्जा मिळाली.आणि निव्वळ आनंदाच्या देही,आनंदाच्या डोही या भावनेतून मी घरी मनांतील साचलेली जलमटे साफ झटकून पावसाच्या सरीनतंर जसे शांत, निवांत वाटते त्याप्रमाणेच निर्मल होऊन घराकडे परतलो.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन