
आज मत्स पुराण लावत आहे. ते पण गाभोळीच्या प्रकारावर! माझ्या सौभाग्यवती उषाचा अत्यंत आवडता पदार्थ. प्रजानन कालावधी नंतरची मच्छीमारी वरील बंदी उठल्यावर उषा तिच्या खास कोळीन मैत्रीणीला अगोदरच फोन वरून सांगून बुक करुन ठेवते.
तत्पूर्वी घडलेला किस्साच सांगतोय. अलीकडेच आम्ही परदेश दौरा कॅनडा आणि अमेरिकेत केला. बॅगा भरून तयार झाल्या. घरातून पाच वाजताच निघायचे ठरले होते.
उषा काहीशी अस्वस्थच होती. जरा बाहेर जाऊन येते म्हटल्यावर आम्ही आता कुठे? एकदम कोरस मध्येच विचारले. तोपर्यंत ती दरवाज्यातून बाहेरही पडली होती आणि बरोबर पाऊण तासाभरात परतली सुध्दा! पण तिचा चेहरा मलूल झालेला दिसला. बैचेन वाटत होती. तिनेच चला जेवण करू या असे फर्मान सोडल्यावर भोजन सुरू केले. मी हिंमत करून विचारलेच कुठे गेली होतीस?
इतक्या वेळ गप्प असलेल्या उषाला गलबलून आले. ती म्हणाली गाभोळी घ्यायला. मग मिळाली नाही का? त्यावर तिचा कंठ दाटून आल्याचा मलाच भास झाला. ती म्हणाली गाभोळी घेऊन रिक्षातून आली. रिक्षा भाडे दिले आणि घरी आले . रिक्षाचालक भर्रकन निघून गेला आणि गाभोळीची पिशवी रिक्षातच राहिली. आम्ही सामुदायिक दु:ख व्यक्त केले. मी जास्तच संवेदना दाखवून सांत्वन केले. ही धडपड परदेश दौऱ्यावर जाण्या पूर्वीची फक्त गाभोळी खाण्यासाठीची होती. तर सांगायचे काय तिचे गाभोळी वरील अविचल प्रेम!
दशावतारातील प्रथम अवतार मत्स्य . त्याविषयी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल.देशपांडे,सुप्रसिद्ध लेखक श्री दळवी यांनी भरपूर लिहून ठेवलंय. त्यात मी आणखीन त्यांच्या पुढे काय लिहीणार? भलतीच हिंमत नाही करू शकत.
पण गाभोळी कशी घ्यावी याची जाणकारी मला आहे .याचे कारण उषाने ही चर्चा घरात अनेक वेळा घडवून आणली आहे. माझी श्रवण क्षमता चांगलीच असल्याने हे ज्ञान पक्के झाले आहे. पाले माशाची गाभोळी अतिचवीष्ट इति उषा उवाच! यापुढे सर्व मते आणि माहिती तिचीच.मी ऐकलेले फक्त निवेदन सादर करतोय.माझ्या पदरचे काहीच नाही कृपया हे लक्षात घ्यावे.
तर प्रथम पालेकर माशाची गाभोळी पोट फाडून बाहेर काढून तिची साईज पाहून किंमत ठरवावी. यावर कोळीन म्हणणार तू गाभोळी घेतली नाहीस तर? पुढचे संवाद विस्तार भयास्तव लिहीत नाही. मग मासली बाजारातून घरी. पुढची पाक प्रक्रिया ती स्वतःच करणार. तिच्या रेसिपीचे मालकीहक्क तिच्याकडे असल्याने त्याचे उल्लंघन मी करू शकत नाही हे सुज्ञास सांगणे न लगे!
म्हणून आम्ही परदेश दौऱ्यावरून परत आल्यावर तिच्या ताटात गरमागरम गाभोळी सरप्राईज वाढल्याने वर्ष सार्थकी लागल्याची भावना चेहर्यावर चांगलीच दिसून आली. असो. असे हे गाभोळी पुराण!
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











