डॉ भास्कर धाटावकर लेखमाला: राष्ट्रीय जीवनात अभिलेखाचे महत्त्व – 2

अशी झाली निश्चित राजश्री शाहूमहाराजांची जन्मतारीख.

थोरामोठ्यांच्या जन्मतारीखेचा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती शाहूमहाराज यांच्या जन्मतारखेचा वाद ऐतिहासिक अस्सल दस्तावेजच्या साक्षीने कसा सुटला हे आजच्या लेखातून स्पष्ट करू या. त्यावरून राष्ट्रीय जीवनात अभिलेखांचे असलेले महत्त्व अधोरेखित होईल.

Chatrapati Shahu Maharaj

शिवाजीमहाराजांचा जन्म

शिवाजीमहाराजांचा जन्म शके 1551 शुक्लनाम संवत्सरी उत्तरायण फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवारी झाला ही बाब उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक दस्तावेजाच्या व शिलालेखाच्या आधारे निर्णायकरित्या सबल पुराव्या आधारे स्पष्ट झाले आहे. आता कोणते पुरावे उपलब्ध झाले ते पाहू.

Chatrapati Shivaji Maharaj with mother Jijabai
Chatrapati Shivaji Maharaj

कविंद्र परमानंदानी शिवभारत ग्रंथातील सहाव्या अध्यायात शालिवाहन शके 1551 शुक्लनाम संवत्सरी अशीच नोंद केली आहे. कविंद्र परमानंदाची स्वतः शिवप्रभुंनी त्यांची आत्मचरित्र लिहिण्यास नेमले होते.

शिवशकावलीत अशीच स्पष्ट नोंद असून राजश्री शिवनेरीस उपजले या दोन्ही टिपणात खूप साम्य आहे.

बिकानेर संस्थानील पंडित मीठालाल व्यास यांच्याकडील जी शिवाजीमहाराजांची कुंडली सापडली त्यामध्ये व अजमेरचे पंडित गौरीशंकर ओझा यांचे महाराजांच्या जन्म टिपणात एकदम तालमेल जुळतो. शिवाजीमहाराजांचे तंजावरचे सावत्र बंधू व्यकोंजी यानी वंशवेळ संबधी कोरलेल्या शिलालेखात शके 1551 अशीच जन्मतारीख दिलेली आहे.

रामचंद्र अमात्य राजनिती जी घटनांची क्रमवारी दिली आहे ती सुध्दा शके 1551 लाच दुजोरा देत आहे. शेवटी जेधे शकावलीतील नोंदही याच तारखेची पृष्ठी करते. शिवचरित्रातील त्यांनी ठेवलेल्या नोंदी अत्यंत विश्वासार्थ मानल्या जातात. या सर्व दस्तावेज पुराव्यानुसार शिवाजीमहाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 अशी निश्चित करण्यात आली.

शिव जन्मतारीखेचा वाद सोडविण्यासाठी शासनाने सन 1965 साली एक समिती नेमण्यात आली होती पण त्या समितीत एकमत न झाल्याने हा विषय तसाच प्रलंबित राहिला होता आणि त्यातील सर्वच सदस्य जीवीत राहीले नव्हते. नव्याने अनेक पुरावे इतिहास संशोधकांच्या हाती आले होते.

शेवटी शासनानेच पुढाकार घेऊन तत्कालीन शिक्षण मंत्री प्रा.मोरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय क्र.जपुनी 2200/प्र. क्र.2000/ 29 दिनांक 15 फेब्रुवारी 2000 रोजी छत्रपती शिवाजीमहाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 अशी जाहीर करण्यात आली आणि या वादावर अस्सल कागदपत्रांद्वारेच तोडगा काढण्यात आला. पुराभिलेख विभागाकडे हे प्रकरण सोपविण्यात आले होते त्यामुळेच शासनाकडे जन्मतारीखे बाबतचा जो अंतिम अहवाल पाठविण्यात आला त्याचा मसुदा तयार करण्याचे भाग्य मला लाभले.

काही वर्षांनी राजर्षी शाहूमहाराजांच्या जन्मतारीखेविषयी वाद निर्माण झाल्यावर शासनाने जी समिती गठीत केली होती त्यामध्ये डाॅ.जयसिंग पवार, डाॅ.रमेश जाधव, डाॅ. अरूण भोसले तिघेही कोल्हापूरचे प्रा.राजा दिक्षित, पुणे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. य. दि.फडके आणि विश्वास पाटील मुंबई आणि पुराभिलेख विभागाचे संचालक डाॅ.भास्कर धाटावकर यांची समिती सचिव म्हणून दिनांक 23. 6. 2005 शासन निर्णयानुसार समिती स्थापन झाली होती.

या जन्मतारीखेचा वाद कशा प्रकारे निकाली काढण्यात आला त्याचा सविस्तर अहवाल मी माझ्या ऐतिहासिक लेख संग्रह या पुस्तकातील लेखात पृष्ठ 70 ते 104 मध्ये तपशीलवार माहीती दिलेली आहे. जिज्ञासूने ती अवश्य पाहावी. येथे त्यातील कोणत्या कागदपत्रांतील पुरावे साक्षीदार म्हणून तपासले त्यांचाच उल्लेख करीत आहे.

प्रो. रावबहादुर लठ्ठे, राजर्षीचे दिवाण व प्रथम चरित्रलेखक यांनी जन्मतारीख 26 जुलै 1874 अशी लिहीली तिचाच आधार घेऊन सुप्रसिद्ध चरित्र लेखक धनंजय कीरांनी त्यांच्या ग्रंथात नमूद केली. मग सर्वच लेखकांनी हीच तारीख गृहीत धरून चालले.

मी सर्व प्रथम वृत्तपत्रातून ज्यांना जन्म तारीखेविषयी काही माहीती, मते, कागदपत्रे सादर करावयाची असतील ती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.

त्याच बरोबर समिती सदस्यांच्या एकूण समितीच्या एकूण तीन मुंबईत एक, व कोल्हापूरात दोन मिटींग घेण्यात आल्या. प्रत्येक सदस्यांनी आपले अभिप्राय त्यांच्याकडील पुराव्यासहित मांडले जे सदस्य गैरहजर राहिले त्यांना बैठकीचे इतिवृत्त, उपलब्ध झालेले कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती, पाठवून दिले जात होते.जनसमुदायांकडून याबाबत प्रतिक्रियाही येत होत्याच.

याबाबत अॅड मानसिंगराव खांडेकर यांनी जन्मतारीखेबाबत लेखमालाच सुरू केली होती तिचाही अभ्यास करण्यात आला.

याकामी Report on G A D dt.of Shahu Maharaj, Printed Report of S.M.Fresar असे अनेक पुरावे उपलब्ध झाले यामधील निर्णायक पुरावा ग्राह्य धरण्यात आला तो म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहूमहाराजांना 13 जून 1920 रोजी पाठविलेले पत्र !

मूकनायक अंक

परळ, मुंबई दिनांक 13.6.1920

श्रीमंत महाराज शाहू छत्रपती, करवीर

हुजूरांच्या सेवेशी

माणगावच्या व नागपूरच्या सभेत पास झालेल्या ठरावास अनुसरून तारीख 26 जूनचा दिवस आपला वाढदिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. त्याचदिवसी आपल्या आश्रयाखाली निघत असलेल्या मूकनायक चा स्पेशल अंक काढण्याचे नियोजन झाले आहे. त्यात हुजूरांचा फोटो तसेच आपल्या कारकीर्दीतील कार्याची उज्ज्वल साग्रसंगीत रूपरेखा देण्यात येणार आहे. यास्तव कुल अमदानीची इत्यंभूत हकिकत मिळण्याबद्दल मी एकवेळा विनंती केली होती पण, अद्यापि हाती आलेली नाही.याबद्दल दिलगीरी वाटते. दिवस अगदी थोडेच उरले आहेत तेव्हा मी स्वतः येऊन अवश्य असलेली माहीती गोळा करण्याचे ठरविले आहे. या आदेशास्तव मी आज संध्याकाळी कोल्हापूरला येण्यास निघत आहे. मंगळवारी संध्याकाळी पोहोचेन. हुजूरांच्या दर्शनाचा लाभ होईलच.

आपला कृपाभिलाषी

भीमराव आंबेडकर

त्याच बरोबर प्रबोधनकार के. सी.ठाकरे यांनीही 26 जूनच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या त्याबद्दल आभाराचे पत्र 28 जून 1920 रोजी महाराजांच्या वतीने आर.व्ही.सबनीस यांनी पाठवून दिले होते. यासर्व पुराव्यास सदस्यांनी एकमताने सहमती दर्शविल्यानंतर डाॅ.भास्कर धाटावकर यांनी शासनास तसा अहवाल पाठविला व तो अहवाल स्वीकारण्यात येऊन मा. विलासराव देशमुख मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शाहूमहाराजांच्या सुधारित जन्मतारीख 26 जून 1874 ही तारीख विधानसभेत जाहीर केली व हा दिवस सामाजिक न्याय म्हणून साजरा करण्यात येत आहे.

ह्या समितीचे काम दिलेल्या मुदती अगोदरच पुर्ण केल्याबद्दल कोल्हापूरांनी माझे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदनही केले. वृत्तपत्रातून कौतुकही करण्यात आले. थोडक्यात अस्सल कागदपत्रांद्वारेच असे वादविवाद सोडविले जातात.

या समितीचे एक सदस्य प्रा रमेश जाधव यांचा अभिप्राय खालील प्रमाणे आहे तो देत आहे.

महाराष्ट्र शासनानेही या विषयाचे महत्व जाणून शासनाचे उत्साही, निगर्वी, धडाडीचे व अभ्यासू पुराभिलेख संचालक डाॅ.भास्कर धाटावकर यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू छत्रपती जन्म दिनांक अन्वेषण समिती नियुक्त केली त्यामुळेच या विषयाला चालना मिळाली.

प्रा. डाॅ. रमेश जाधव, कोल्हापूर

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक , महाराष्ट्र शासन.

मोबाईल 835 595 7451

Dr Bhaskar Dhatavkar