
खंरच पेशवाईत ध चा मा आनंदीबाईने केला होता ?
पानिपतच्या युध्दाने पेशवाई हादरून गेली होती काही महिन्यानंतर नानासाहेब पेशव्याचे निधन झाले होते. त्यानंतर पेशवाईची वस्त्रे आपणांस मिळतील याची आस धरून बसलेल्या राघोबादादाची घोर निराशा झाली होती. अपेक्षाभंगाची जखम खूप खोलवर जाते.
नानासाहेबाचे दुसरे पुत्र माधवराव यांची सातारच्या गादीने पेशवे म्हणून नेमणूक केल्यानंतर राघोबाची अत्यंत निराश झाले होते. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी ती अवस्था फार क्लेशदायक होती. दिवस जात होते. राघोबा मुळातच हलक्या कानाचा कुणी पेशवेपदाचा विषय काढला कि सत्तेची न मिळालेली जखम भलभलून वाहात राही. सन 1773 उजाडले. कटकारस्थानांना उत आला होता. आणि आता नाही तर कधीच नाही या मानसिकतेतूनच ध चा मा हे रक्तरंजित प्रकरण घडून आले.

तेव्हाही सुपारी घेऊन मारेकरी मुबलक मिळत होते आणि आजही तेच चालू आहे. खरकसिंग, सुमेरसिंग व महमंद इसब यांच्यावर नारायणास चिरविश्रांती देण्याची कामगिरी सोपविण्यात आली होती. शनिवारवाड्यात गणेश उत्सव सुरूच होताच. नारायण आपल्या सासुरवाडीस जाऊन साखरभाताचा आस्वाद घेऊन तृप्तीचे ढेकर देत वाड्यात परतला होता तो दिवस होता 30 ऑगस्ट 1773. आता वाचकांसाठी या दुदैवी घटनेवर प्रकाश टाकणारा ऐतिहासिक लेख संग्रह पृष्ठ 1989 हे पत्र पुण्याहून मिरजेस वामन पटवर्धन यांस नारायणच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवसी लिहीले आहे.( अशी अनेक पत्रे पुण्याच्या पेशवे दप्तरात साक्ष देण्यास उपलब्ध आहेत आणि अनेक मान्यवर इतिहासकारांनी त्यांचा सखोल अभ्यास करून या घटनेवर वस्तुनिष्ठ लिखाण केले आहे.) गारदी मद्यप्राशन करून बेफाम झाले होते. ते नारायणास ठार मारण्यासाठी त्यांच्या वाटेत आलेल्याना कापीत नारायणाचा पाठलाग करीत होते. नारायण गोशाळेत धावत गेला तेथील दोन गायीची कत्तल गारद्यानी केली. चार ब्राह्मण, चाफाजी खिसमतगार ठार झाला. या गडबडीत नारायण राघोबादादाजवळ कसाबसा पोचला व आर्त स्वरात विनवणी करू लागला, ” दादासाहेब, मला वाचवावे. किल्ल्यावर घालावे, नाचण्याची भाकर द्यावी असे म्हणत गळा मिठी मारली तेव्हा राघोबानी लोटून दिले. तुळाजीने पायास धरून ओढिल्यावर सुमेरसिंगने वार टाकिला सहा वारांनी पुरा झाला. तेथेच चाफाजी ठार झाला.
यानंतर राघोबाची दिनचर्या नित्याचीच होती. सदरेस जाऊन बसले. चोपदारांस सुचना देऊन बंदोबस्त करू लागले. सुतक नाही. नित्य नमस्कार सुर्यास घालवतात. वैरियाचे सुतक कशास? म्हणतात. गोवध देखील वाड्यात झाला. दोन कुणबिणी मेल्या. बालहत्या, ब्राह्मणहत्या, गोहत्या, स्रिहत्या सारेच झाले. गंगाबाईस आनंदीबाईने खोलीत कोंडून ठेवले. हे राजकारण फार दिवस घाटत होते. नारायणस कैद करावे असे होते पण घडले भलतेच.
आनंदीबाई ही नारायणावर पुत्रवत प्रेम करीत होती. त्याच्या गर्भार पत्नीला ती सती जाण्याची इच्छा व्यक्त करताच तिला खोलीत कोंडून ठेवली. पुढे रामशास्त्री यांनी या प्रकरणाची सविस्तर कागदपत्रे तपासून परिस्थितीजन्य पुरावे पाहूनच राघोबाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली पण त्याकटामध्ये आनंदीबाई सामील होती असे कुठेही म्हटलेले नाही. मात्र पुढे नानानी बारभाईचा कारभार सुरू करून सुत्रे आपल्याच हाती ठेवून आनंदीबाईच्या भोवती अखेर पर्यंत संशयाची सुई फिरवत ठेवली. आनंदीबाई ही गुहागर येथील मातब्बर घराण्यातील, सुशिक्षित, वाचनांची प्रचंड आवड असणारी इतकेच नव्हेतर तिची राजकारणातील गतीही कौतुकास्पद होती. मात्र राघोबादादाच्या चंचल आणि धरसोड्या स्वभावापुढे काही एक चालत नव्हते. तिचे दुर्दैव असे कि तिच्यापोटी दुसरा बाजीराव जन्मास आला तो स्वत:ला रावबाजी म्हणत असे आणि जन्मच हे राज्य बुडविण्यासाठी झालेला आहे असे म्हणण्यात फुशारकी मारीत असे आणि त्यांनी मराठ्यांचे राज्य बुडविला.
आनंदीबाईच्या वाटेला ध चा मा केल्याबद्दल अकारण बदनामी आली पुढेतर समस्त भगिणीवर्गास ती बाई ध चा मा करणारी आहे ही नाहक हेटाळणी आली. हे चुकीचेच आहे. हे कायमस्वरूपी पुसले गेले पाहिजे.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन. मोबाईल 835 595 7451











