1857 चे स्वातंत्र्यसमर प्रकाशात येण्यास ऐतिहासिक कागदपत्रांची झालेली महत्त्वाची मदत
ब्रिटिशांनी 1857 च्या *पहिल्या स्वातंत्र्य युध्दाची मूठभर शिपायांनी केलेले बंड अशी हेटाळणी केली* आणि ईस्ट इंडीया कंपनी सरकाराच्या भयाने सुरुवातीला अनेक महत्त्वपूर्ण दस्तावेज उपलब्ध असूनही सत्य सांगावयास बोलण्यास कोणी धजावत नव्हते. अशी वस्तुस्थिती होती पण ऐतिहासिक कागदपत्रे संशोधकांच्या प्रतिक्षेत होती.
बॅरिस्टर सावरकरांनी या संदर्भातील अव्वल कागदपत्रे अभ्यासून इंग्रज विचारवंतानी कोणत्या नोंदी करून ठेवल्या आहेत त्यांची तपासणी करून हे खऱ्या स्वातंत्र्य समर होते हे प्रसिद्ध केले.
या स्वातंत्र्य समराची पूर्व तयारी म्हणून रक्तवर्णी कमळाचे फूल आणि भाकरी हे प्रतिक गांवोगावी संत महंत फकीर बैरागी यांच्या मार्फत पोहचविण्यात येत होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. 31 मे 1857 हा दिवस निश्चित करण्यात आला.
या युद्धाचे नेतृत्व वयोवृद्ध बहादूर शहा जफरकडे सर्वानुमते देण्यात आले होते आणि त्यासाठी एक युध्द जिंकल्यास सर्व धर्म समभाव निरक्षेपणाने राज्य चालविण्यात येईल अशी फारसी भाषेतील लिखित घटना तयार करून त्यावर सर्वाच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या होत्या. ( *या घटनेची झेरॉक्स प्रत मी स्वातंत्र्यसमराच्या दिडसे वर्ष या ऐतिहासिक कागदपत्रांच्या मुंबईत बालगंधर्व रंगमंदिरातील प्रदर्शनात प्रदर्शित केली होती.*) सन 2005. डाॅ.य.दि.फडके यांनी उद्घघाटन केले होते. बहादूर जफरने स्पष्टपणे म्हटले होते या युद्धातील विजयानंतर भारतीय राजांनी निवडलेल्या राजमंडळाच्या हाती मी सत्ता देईन.
Nana Saheb Peshwa
या युद्धात ध्येयसिध्दीच्या निष्ठेने मार्गदर्शन करण्यास नानासाहेब पेशव्यानी निरपेक्ष भावनेतून पुढाकार घेतला. त्यांना साथ देण्यास तात्या टोपे, झांशीची राणी लक्ष्मीबाई असे अनेक स्वातंत्र्यप्रेमीनी या संगरात झोकून दिले.
सरदार पणिक्करांनी अनेक कागदपत्रे अभ्यासून *सर्वे ऑफ इंडियन हिस्टरी*या ग्रंथात नमूद केले आहे कि ब्रिटिशांना हाकलून लावणे हे एक राष्ट्रीय उत्थान होते.
या स्वातंत्र्य युद्धाविषयी लॉर्ड बॅटन लिहीतो, ” धार्मिक बाबतीत हस्तक्षेप, जनतेवर दडपशाही, सैनिकांना अपमानास्पद वागणूक अशा अनेक घटनांचा उद्रेक कारणीभूत होता.
*एक ब्रिटिश विचारवंत जी.डब्ल्यू. स्टिव्हन्स यांने India of Yester Years* या ग्रंथात नमूद केले आहे कि मराठ्यांनी हे कायम लक्षात ठेवले इंग्रजांनी आपले राज्य, आपली संस्कृती, आपला धर्म, आपली परंपरा बुडवून नीच अवस्थेत आणले ही भावना कधीही विसरले नाहीत. इंग्रज फक्त मराठ्यांनाच घाबरून आहेत. चार्ल्स बाॅल याच्या नोंदीतून इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचे सविस्तर माहिती मिळते.
यातील नानासाहेबांचा उजवा हात असलेला निष्णात वकील अजमुल्ला खान यांनी आपल्या धन्यासाठी कायदेशीर बाजू मांडली पण त्याला फाशीची शिक्षा दिल्यावर त्याने धीरोदात्त पणाने फाशीचा दोर मानेत अडकविले. तात्या टोपेनी इंग्रजाना खडसावून सांगितले कि मी तुमचा नोकर नाही, मी माझ्या मातृभूमीसाठी आणि धन्यासाठी केले. मी इंग्रज स्त्रियांची, मुलांची हत्या केली नाही.शेवटी टोपेही हसत हसत फाशीच्या तख्तावर चढले.
Mangal Pandey
तत्कालीन कारण म्हणजे काडतूस प्रकरण. ही बाब सर्व प्रथम मातादीन या मातंग समाजातील तरूणानी उघड केले होते.( याची कागदपत्रे नॅशनल अर्काव्हिज दिल्ली मध्ये उपलब्ध आहे.)
मंगल पांडेनी 31 मे 1857 च्या पुर्वीच काडतूस कारणावरून पहिली गोळी झाडली यावेळी पुर्ण तयारी झालेली नव्हती पण ठिणगी पडली तिचा वणव्यात रूपांतर झाले हे सर्व आपणांस ज्ञात आहेच.
या स्वातंत्र्य समारातचा इतिहास सांगण्यास ही ऐतिहासिक दस्तावेज उपयोगी पडली
डाॅ.भास्करधाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक. महाराष्ट्र शासन मोबाईल 835 595 7451