
छत्रपती शिवाजीमहाराज हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत! त्यांच्या नामोच्चारांनेच मराठी मनं, मनगटांना चेतना मिळते. उर्जा मिळत असते. शिवप्रभुंची कीर्ती सातासमुद्रापार 1672 मध्येच गेली होती. लंडन टाईम्स या तत्कालीन वृत्तपत्रातून महाराजांचे गुणगान पहिल्या पृष्ठावर छापण्यात आले होते. हे वृत्तपत्र आजही लंडनमधील अभिलेखागारात जतन करून ठेवण्यात आले आहे.
शिवछत्रपतींच्या हस्ताक्षरातील अस्सल पत्रांचा एक प्रकाशन प्रसिद्ध करण्याचा आदेश माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाणसाहेब यांनी 1 मे 1987 रोजी ऐतिहासिक अभिलेख व छायाचित्रांचे प्रदर्शन पाहिल्यानंतर मला दिला होता त्याप्रमाणे 1646 ते 1679 पर्यन्तची जी फक्त 13 पत्रे महाराष्ट्रातील निरनिराळ्या अभिलेखागारात उपलब्ध होती ती एकत्रित करून *शिवछत्रपतींच्या पत्रांचे प्रतिरूप दर्शन या मी संपादक असलेल्या पुस्तकाद्वारे प्रकाशित करण्यात आली*.

या पुस्तकातून शिवाजीमहाराजांच्या राजनितीचे यथार्थ दर्शन होते. या सर्वच पत्रामध्ये त्यांच्या संस्कृत प्रचूर अष्टकोनी राजमुद्राचा समावेश आहे. यातील एकेक पत्र म्हणजे स्वतंत्र शोधनिबंधाचा विषय आहे.
यातील एक पत्र 1678 सालातील असून सरदार पाटणकर युध्दात धारातीर्थी पडल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी महाराजांनी रायगडावरून पाठविला आहे. त्यांची विचारपूस करून कुटुंबातील सर्वानाच आश्वासित करून भविष्यातील चिंता वाहणारे शिवराय वेगळीच उंचीवर गेल्याचे आपणांस दिसून येते.
ही सर्वच तेरा पत्रे शिवाजीमहाराजांच्या निरनिराळ्या पैलूचे विलोभनीय दर्शन घडवितात. असे ऐतिहासिक दस्तावेज इतिहासाचे साक्षीदार होतात.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन मोबाईल 835 595 7451












