
कोल्हापूर पुराभिलेखागार! अस्सल ऐतिहासिक दस्तावेजांचा खजिना !
महाराणी ताराबाईनी औरंगजेबशी प्रखर लढा देत हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. सुरुवातीस पन्हाळगडावर तात्पुरती राजधानी त्यानंतर करवीर नगरीची निर्मीती करून या नगरीला राजधानीचा दर्जा देऊन तिचा सर्वागीण विकास घडवून आणला.तेव्हापासून आजतागायत या कलानगरीत विवीध क्षेत्रातील अनेक गुणीजनांनी आपल्या कर्तबगारीचा अमीट ठसा उमटविला आहे. राजर्षी शाहूमहाराजांचा कालखंड हा कोल्हापुरातील सुर्वणकाळच होता. त्यामुळेच या आकाराने छोट्या पण प्रबोधनात्मक विचाराने फार प्रगल्भ मोठ्या असलेल्या संस्थानाची दिगंत किर्ती अखंड हिंदुस्थानात पसरली होती.
या कोल्हापुरातील अभिलेखागारात छत्रपती शिवप्रभुंच्या काळापासून ते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा छ.राजाराम महाराजांपर्यतचे ( राजर्षीचे कर्तव्यदक्ष, कर्तबगार चिंरजीव ) ऐतिहासिक ह्ष्ट्या फार मौल्यवान दस्तावेज जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. त्यांची धावती ओळख करून देण्याचा प्रयत्न या लेखातून करीत आहे.
1) — देहझाडे बाबतची कागदपत्रे 1827– 1841 या दप्तरात आहेत.
2) ‐- बाॅम्बे गव्हर्न्मेंट गॅझेट 1916 — 1960 मुंबई शासना निर्णाय प्रती.
3) — महाराष्ट्र शासन राजपत्र 1987 पर्यन्तचे येथे ठेवण्यात आले आहेत.
4) — हुजूर रेकॉर्ड, संस्थान कालीन सर्व दस्तावेज, इचलकरंजी दप्तर अशा अगणित महत्त्वपूर्ण अभिलेख येथे इतिहास संशोधकांशी इतिहासातील सत्याबाबत हितगुज करण्यास उत्सुक आहेत.
5) — कोल्हापुरातील संदर्भ ग्रंथालयात अति दुर्मीळ अशी 5733 पुस्तके, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ 1500
6) — कोल्हापूर स्टेट गॅझेट 1880– 1949 पर्यन्तची.
तशी या अभिलेखांची जंत्री खूपच लांबलचक आहे.
सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे शिवकाळातील महत्त्वपूर्ण घटनांवर आजही ही कागदपत्रे प्रकाशझोत टाकू शकतात. या कागदपत्रातून मी राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश आणि छत्रपती राजाराम महाराजांचे निवडक आदेश हे दोन महत्त्वपूर्ण पुस्तके संपादित करून प्रकाशित केली . त्यांचे प्रकाशन स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे आजही माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणसाहेब यांच्या हस्ते विधान भवनात झाले होते. हे निवडक आदेश आजही मार्गदर्शक असेच आहेत.
राजर्षींच्या कोल्हापुर रेसीडेन्टिसींचा मुंबई सरकारशी झालेला पत्रव्यवहार राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली तसेच लंडनमधील दप्तरखान्यात जपून ठेवण्यात आला आहे.
शाहूमहाराजांच्या राज्य कारभाराची जनरल, मुलकी , आणि न्यायखाते असे विभाग होते.जनरल खातेप्रमुख दिवाण, मुलकी खातेप्रमुख सरसुभे व न्यायखातेप्रमुख सरन्यायाधीश असत.
या दप्तरखान्याच्या व्यवस्थापनावर शाहूमहाराज स्वतः कटाक्षाने लक्ष ठेवीत होते. एका शासकीय आदेशात राजर्षीने नोकराने ऑफीसला आल्यावर सही करून त्यावर वरीष्ठांची सही घेऊन ऑफिसात येण्याची वेळ नोंदवून स्टेशन बंगल्यावर हुजूर क्लार्ककडे साडेअकरापर्यंत पाठवावे असे सक्त आदेश दिले होते. पुर्वी दप्तरखान्यात लोडाला टेकून कारकून बाबू काम करीत इतकेच नाहीतर दुपारची वामकुशी या लोडाच्या सहाय्याने शांतपणे घेत. हे राषर्षीच्या लक्षात येताच त्यांनी लोड, गादी हटवून मेज, खुर्चीचा वापर करण्याचा आदेश दिला आणि तो लागलीच अंमलात आला. दप्तरखान्यात कुरकुर झाली, बिचार्यांची वामकुशी हरवली होती.
कला, क्रिडा, चित्रकला, चित्रपट सृष्टी, गायन कला, संगीत क्षेत्र, कुस्तीगारांना दिलेला राजाश्रय, शैक्षणिक कार्य, पददलितांच्या उध्दारांचे अभूतपूर्व कार्य आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी दिलेला आश्वासक हात याविषयीची लाखमोलाची ऐतिहासिक अस्सल अमोल कागदपत्रे या कोल्हापूराच्या अभिलेखागारात इतिहास संशोधकांची प्रतिक्षा करीत आहेत. इतिहास प्रेमीना तेथे अवश्य भेट द्यावी अशी विनंती आहे.ही कागदपत्रे अजूनही अज्ञात इतिहासातील अप्रकाशित घटनेवर तुमच्याशी हितगुज करतील.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन मोबाईल 835 595 7451











