
मुंबई : कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं राज ठाकरे निवडणूक लढवण्यास राजी झाले असून मनसे राज्यात किमान १०० जागा लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थात, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
भाजपकडून ‘ईव्हीएम’ मॅनेज होत असल्याची ठाम समजूत झालेल्या राज यांनी सुरुवातीपासूनच निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. अन्य विरोधी पक्षांनाही त्यांनी तसे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यांनाही राज यांचा हा विचार पटलेला दिसत नव्हता. पक्ष टिकवायचा असेल तर निवडणूक लढली पाहिजे, असाच सर्वांचा सूर होता.
या साऱ्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मनसेची महत्त्वाची बैठक झाली. त्यात मनसेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. निवडणूक लढवायची झाल्यास आपली किती तयारी आहे, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादसह काही ठराविक शहरांत १०० च्या आसपास जागा लढण्याचा निर्णय झाल्याचं समजतं.






