कंपनी करात कपात; केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

कॉर्पोरेट टॅक्स घटताच, शेअर बाजारात उसळी

गोवा: कंपनी करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर २२ टक्के करण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे मंदावलेल्या अर्थ व्यवस्थेला सरकार मार्फत गती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. उत्पादन आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात केलेल्या बदलांची अंमलबजावणी या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असून, कोणतीही सवलत न घेणाऱ्या भारतीय कंपन्यांना २२ टक्के कर द्यावा लागेल आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण २५.१७ टक्के कर द्यावा लागेल.

शेअर बाजारात उसळी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्स दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात तेजी आली. बीएसईचा प्रमुख निर्देशांक १६०० अंकांनी उसळून ३७,७६७.१३ वर पोहोचला. गेले काही दिवस शेअर बाजारात आलेली मरगळ अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे दूर झाली. गुंतवणूकदारांनी या उसळीनंतर शुक्रवारी सकाळी शेअर बाजारातून चक्क २.११ लाख कोटी रुपये कमावले.
वाढलेल्या निर्देशांकामध्ये बँकिंग आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. सेन्सेक्स सर्व ३० शेअर्सच्या उसळीनंतर १६०० अंकांनी वधारला. निफ्टी ११,००० वर पोहोचला. निफ्टीच्या ५० पैकी ४९ शेअर्समध्ये तेजी आहे. २० मे नंतर बाजारात आलेली ही सर्वात मोठी तेजी आहे. यापूर्वी लोकसभेच्या एक्झिट पोलच्या वेळी शेअर बाजार उसळला होता.