महाराष्ट्राचं काय होणार ? दोन मुख्यमंत्री चालतील पण सरकार स्थापन करा. . .

महाराष्ट्र राज्याच्या चौदाव्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या, निकाल हाती आला आणि जनतेने महायुतीला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा कौल दिला, तरीही आज दहा दिवस व्हायला आले सरकार काही स्थापन झाले नाही. खरं तर ही निवडणूक सर्वच अंगाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

निवडणुकीआधी महायुतीला दोनशेहून अधिक जागा मिळतील असे सर्वच निवडणूक सर्वेक्षणमधून सांगण्यात आले पण महाराष्ट्राच्या इतिहासातील राजकारणात जनतेने असा काही कौल दिला की, निवडणूक जिंकलेल्या महायुतीला मॅन ऑफ द मॅच सन्मान न मिळता तो पटकावला महा आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. महायुतीच असं झालं की, “गड आला पण सिंह गेला”. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीनंतर कोणीही ईव्हीएम मशीन बद्द्ल बोलत नाही. इव्हीएम मशीन हा मुद्दा कायमचा बंद झाला. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे बहुमताचा कौल देऊनही सरकार स्थापन होत नाही.

महाराष्ट्रातील जनतेला वाटलं होतं की, आता कौल महायुतीच्या बाजूने लागला म्हणजे युतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तशी तयारीही सुरू केली. परंतु युतीतील दुसरा पक्ष शिवसेनेच्या मनात मात्र वेगळाच विचार होता आणि महाराष्ट्रातील सत्ता स्थापना थांबली. हीच ती वेळ टॅग लाईन लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाही अशी मागणी लावून धरली.

तेव्हापासून आजपर्यंत दररोज काहीतरी वेगळं ऐकू येत केव्हा अडीच वर्षे मुख्यमंत्री सूत्र, केव्हा उपमुख्यमंत्री पद आणि सोळा मंत्रीपद तर केव्हा केन्द्रात मंत्री पद इत्यादी… एव्हढच काय आता तर असं ऐकू येऊ लागलं आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापन करणार आणि त्याला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार. हे सगळं पाहिलं की वाटतं तुम्ही निवडणूक घेताच कशाला? महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सध्या टीव्हीवरील मालिकां प्रमाणे झालं आहे. दररोज नवीन वळण आणि मग आपण, आता पुढे काय होणार याच्या उत्सुकतेत राहतो आणि सारखं टीव्ही वर पहा किंवा मोबाईल मध्ये पाहतो काही नवीन आहे का?

जनमताचा आदर राखायचा नाही आणि म्हणायचे ही जनतेसाठी लढाई आहे. तुम्ही जर का युती करून निवडणूक लढवली तर मग का नाही दोन पक्षात सामंजस्य करार केला? करार केला असता तर निदान महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला कळलं तरी असतं तुमच्यात नेमकं ठरलं काय? उगाचंच तुम्ही वावड्या उडवीत राहिलात आमचं ठरलंय. जर का ठरलं होतं तर का नाही अजूनही सत्ता स्थापन करण्यास पुढे का येत नाही?

महायुतीतील दोन्ही प्रमुख पक्षांना स्वतःच मुख्यमंत्री पाहिजे आहे. हे आधीच का नाही ठरवलं होतं? शिवसेनेचं म्हणणं असं आहे की, लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीच भाजपा बरोबर ठरलं होतं की, विधानसभा निवडणुकीत निकालानंतर सत्तेत समसमान वाटा असेल आणि हे खुद्द अमित शहा यांच्या उपस्थितीत ठरलं होतं. देवेंद्र फडणवीस मात्र या गोष्टीचा साफ इन्कार करीत आहेत तर शिवसेनेचे संजय राऊत अधिक आक्रमकपणे “अडीच वर्षे मुख्यमंत्री आमचा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्री त्यांचा” हेच ठरलं होतं. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोणीच पुढे येत नाही आणि महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता आणि पूरग्रस्त शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडून देण्यात आली आहे…

शिवसेना आणि भाजपाच्या लढाईत त्यांच्या मित्र पक्षांची पण कोंडी झाली आहे. म्हणूनच या समस्येवर एक भन्नाट कल्पना सुचली आहे. दोन मुख्यमंत्री करा. भाजपाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते नागपूरहून कारभार पाहतील तर शिवसेनेचा मुख्यमंत्री कोणतेही ठाकरे (उध्दव किंवा आदित्य) मुंबईहून कारभार पाहतील.

काय कशी वाटली ही दोन मुख्यमंत्रीची कल्पना? आहे की नाही भन्नाट? बघा यात दोन्ही पक्ष आनंदी आणि सत्ता स्थापनही होईल म्हणजे जनताही आनंदी. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर मुंबई अधिवेशनात ठाकरे मुख्यमंत्री असतील. म्हणजे ठरल्याप्रमाणे सत्तेत समसमान वाटा मिळाला अस म्हणायला हरकत नाही.

असो काहीही करा दोन मुख्यमंत्री झाले तरी चालतील पण हा सत्तेचा खेळ खंडोबा थांबवा एकदाचा. जनता कंटाळली आहे तुमच्या या दाबावतंत्राच्या राजकारणाला.