सहकाराच्या माध्यमातूनच कोकणचा सर्वांगीण विकास शक्य : संजय यादवराव

श्री कुंभाजाई को ऑ क्रे सोसायटीचा चा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा दिमाखात साजरा

मुंबई: कोकणचा माणूस कष्टाळू आणि स्वाभिमानी आहे.त्यांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटविला असला तरी त्यांना सहकार क्षेत्रात दमदार कामगिरी करता आलेली नाही.पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराच्या जाळयाने त्या भागाचा विकास झाला आणि तरूणांच्या हातांना काम मिळाले. कोकणचा सर्वांगीण विकासही सहकाराच्या माध्यमातून शक्य आहे, असे प्रतिपादन कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी केले. श्रीकुंभजाई को. आॅप. सोसायटीचा रौप्य महोत्सव परेलच्या शिरोडकर हॉलमध्ये बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कोकणात शेतकºयांनी कधी आत्महत्या केलेली नाही.आणि त्याने कोणाचे कर्जही बुडविलेल नाही.आपल्या कष्टाच्या जोरावर ते आपला आणि गावांचा विकास करत आहेत. पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार आणि अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी या गावांचा दाखला देत ते म्हणाले की, या गावांना अमाप प्रसिध्दी मिळाली आहे.मात्र त्यांच्यापेक्षा अधिक चांगली गांवे कोकणात आहेत पण त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही अशी त्यांनी खंत व्यकत केली.तरूणांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जिल्हयाचा आणि पर्यायाने कोकणाचा विकास करावा असे त्यांनी आवाहन करत श्रीकुंभजाई संस्थेने २५ वर्षाच्या काळात केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांनी अशीच घौडदौड सुरू ठेवावी असे मत व्यकत केले.

पुण्यनगरीचे पत्रकार जयवंत बामणे यांनी आपल्या मनोगतात श्रीकुंभजाईच्या विकासाचा पट उलगडून दाखवत प्रत्येक संस्थेने अशा प्रकारचा स्वच्छ कारभार केला तर राज्याचा आणि कोकणचा विकास व्हायला वेळ लागणार नाही असे म्हटले. कुंभवडे गावच्या तरूणांनी आपल्या गावांशी जुळलेली नाळ तुटू न देता विकासासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. दै.सामनाचे उपसंपादक मंगेश मोरे यांनी कोकणच्या विकासाचे अनेक दाखले देत वैभववाडीनेही तो वारसा जपला असल्याचे सांगत यापुढेही त्यांच्या प्रगतीचा रथ धावला पाहिजे असे मत मांडले.

संस्थेचे अध्यक्ष महादेव शिंगरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.व सामाजिक बांधिलकी जपून करत असलेल्या अनेक कार्याचा उहापोह करत सर्वांनी असेच पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक, राजकीय,साहित्य क्षेत्रात चांगली कामगिरी करणारांचा संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह आणि भेट वस्तू देउन गौरव करण्यात आला. तसेच खजिनदार दीपक सावंत यांनी संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेचे इतर मान्यवर सौ सुषमा तावडे मॅडम, विजय सावंत, आणि श्री वासुदेव काटे यांचीही भाषणे झाली.

शेवटी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मराठी पाऊल पडते पुढे या संगीतमय कार्यक्रमाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ व सभासदांनी विशेष मेहनत घेतली.