मोबाईल फोनचा आणि स्मार्ट उपकरणाच्या अतिवापराने होवू शकतात तुम्हाला विविध प्रकारचे आजार

आजच्या आधुनिक काळात स्मार्ट उपकरणाशिवाय जगणं म्हणजे अशक्यच. मग मोबाईल फोन असो, टीव्ही असो, लॅपटॉप असो किंवा कॉम्पुटर असो. यासगळ्यामध्ये स्क्रीनही आलीच. स्क्रीन मग ती टीव्हीची असो, स्मार्टफोनची किंवा संगणकांची सतत कोणत्या ना कोणत्या स्क्रीनसमोर आपण सतत असतोच. त्याचा त्रास रोजच्या रोज कदाचित जाणवत नाही, मात्र शरीरावरचे त्याचे दूरगामी परिणाम भयंकर असू शकतात. भारतातील अभ्यासानुसार पाचपैकी एक व्यक्ती मणक्याच्या आजारानं त्रस्त आहे. मणक्यावरील ताणामुळे निर्माण होणारी कंबरदुखी, पाठदुखी, खांदेदुखी, अंगठा दुखणं याचबरोबर सौम्य व तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, मानदुखी आदी समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.

इंटरनेटला 4जी पर्यंतची वेगवान गतीची जोड मिळाल्यानं ‘नेटकरी’ लोकांची संख्या दिवसागणिक शेकडय़ांनी वाढतेय. यामुळे व्यक्ती-व्यक्तींमधील ‘संवादांचं’ माध्यमच बदलून गेलं. संवाद बोलण्याऐवजी लिखित माध्यमातून होऊ लागला. म्हणजेच संवाद ‘टॉक’ कडून ‘टाइप’ करण्याकडे वळला.

संवादाबरोबरच स्मार्टफोनचा वापर, ईमेल करणं, ऑफिसची कामं, पुस्तक वाचन, व्हिडीओ, चित्रपट पाहणं याही गोष्टींसाठी करतात. हे सर्व केलं जातं ते तासन्तास मान खाली घालून. लॅपटॉप, आयपॅड वा टॅब वापरतानाही हेच होतं. ही सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं उभ्यानं हाताळता येत नाहीत म्हणूनच बसून तासन्तास काम केलं जातं. असं मान खाली घालून तासन्तास काम केल्यानंच मणक्यावर प्रचंड ताण येतो आणि मग मणका, आजूबाजूचे स्नायू, कंबर, मान, हात, हातांची बोटं, पाय इत्यादीचं दुखणं सुरू होतं.टॅब, स्मार्टफोन, लॅपटॉपसारख्या छोटय़ा आकाराच्या उपकरणांबरोबरच चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे उद्भवणाऱ्या मणक्यांच्या आजारांना ‘आय पोस्चर’ (i posture) समस्या म्हटले जाते. मणक्यावर येणाऱ्या ताणामुळे निर्माण होणारी कंबरदुखी, ‘टेक्स्ट नेक’ मानदुखी, स्पायनल डिस्कवर ताण येणं, तेथील लिगामेंट अर्थात स्नायुबंध, हाताचा अंगठा आणि संपूर्ण हाताची हाडे व स्नायु दुखणं या समस्या दिसतात.

लहान वयात डोकं खाली घालून तासन्तास बसल्यानं मुलांच्या मणक्यांच्या तसंच डोळ्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होताना दिसताहेत, असं सर्वेक्षण केलेल्या तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे. त्यांच्या मते मोबाइल, टॅबच्या अतिवापराने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुंबईतील तरुणांना मणक्यासंबंधी कोणत्या ना कोणत्या समस्यांना भविष्यात सामोरं जावं लागेल.

मान वाकवून दिवसाला ७-८ तास काम केल्यानं मणक्याच्या मानेच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यातूनच जन्माला येते ती ‘टेक्स्ट नेक’ समस्या.

‘टेक्स्ट नेक’ समस्येवर उत्तम उपचार म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कमीत कमी वापर, वापरादरम्यान ब्रेक घेणं, बसण्याची, फोन धरण्याच्या पद्धतीत सुधारणा करणं हे अत्यंत महत्त्वाचं. तसंच तज्ज्ञांकडून हाताचे, मानेचे काही व्यायामप्रकार शिकून ते नियमित करणं. मुख्य म्हणजे स्मार्टफोन, टॅब वापरताना तो डोळ्याच्या पातळीच्या थोडा खाली असेल असा सरळ ठेवूनच टेक्स्ट टाइप करा, वाचा. असे थोडे बदल केले तरी मानेचं आरोग्य टिकायला मदत होईल.