दख्खनचा राजा श्री जोतीबाची यात्रा कोरोनामुळे रद्द

कोल्हापूर – जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमावर रद्द करण्यात आली आहे.

चैत्र पौर्णिमेला गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर मंगळवारी सुनासुना झाला होता.चैत्र यात्रेचा आज मुख्यदिवस असल्याने लाखो भक्तांचे आराध्यदैवत श्री जोतिबा देवांची दरबारी अलंकारिक महापूजा बांधली होती.

दरवर्षी महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा, गुजरात,आंध्र प्रदेश यासह अन्य काही राज्यातील भाविक चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेसाठी या ठिकाणी येत असल्याने वाडी रत्नागिरीचा डोंगर भाविकांच्या गर्दीत हरवून जात असतो. या अगोदर १८९९ मध्ये प्रथमच जोतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली होती. तेव्हा प्लेगची साथ असल्याने यात्रा बंदचा आदेश देण्यात आला होता.

त्यानंतर पुन्हा एकदा आता कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्या त आली आहे.बंदोबस्तावरील पोलीस यंत्रणा वगळता जोतीबाचा डोंगर पुर्णतः निर्मनुष्य होता.