Lockdown 4.0: महाराष्ट्रात लॉक डाऊन 31 मे पर्यंत वाढविला

मुंबई: कोरोनाचा हाहाकार जगभरात सुरू आहे आणि अजूनही त्यावर औषध किंवा लस उपलब्ध नाही. भारतात कोरोनाचा प्रसार वाढत आहे खास करून महाराष्ट्रात त्याचा वेग अजूनही प्रचंड आहे. आज 17 मे 2020 रोजी लॉक डाऊन चा तिसरा टप्पा संपत आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे राज्यात लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची मुदत 17 मे रोजी संपत आहे. पण, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा घोषित करण्यात आला आहे. हा टप्पा 31 मे 2020च्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे.

राज्यसरकार तर्फे एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तूर्तास लॉकडाऊनमधील सद्यपरिस्थितीतील नियम, बंधने, बंधनांतील शिथीलता तशीच पुढे सुरू राहणार असून त्यात झालेले बदल वेळोवेळी सूचित केले जातील, असंही नमूद करण्यात आलं आहे.

त्यामुळे राज्यात आता पुढील 15 दिवस लॉक डाऊन कायम राहणार असून सर्व नियम आधीच्या लॉक डाऊन प्रमाणेच असतील.