महाराष्ट्र आत्मनिर्भर करायचा असेल तर ग्रीन झोन मधील लोकांनी पुढे यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दिनांक 18 मे 2020) फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधताना मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्मभर करायचा असेल तर ग्रीन झोन मधल्या लोकांनी पुढे यावं असं आवाहन केलं आहे. 

लॉकडाउननंतर राज्यात जे नवे उद्योग येऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन राखून ठेवत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येत्या काळात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे. येत्या काळात आणखी शिथिलता देणार आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आजपर्यंत राज्यात ५० हजार उद्योगांना संमती दिली आहे. ५ लाख मजूर यामध्ये काम करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.  ठाकरे यांनी म्हटले की परदेशातून राज्यात येणारे उद्योजक किंवा देशातीलच काही उद्योजक नवे उद्योग स्थापन करण्यासाठी पुढे येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. प्रदूषण होणार नाही अर्थात ग्रीन उद्योग सुरु करणार असतील त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले.

सरकार आरोग्य योजनेची अंमलबजावणी करीत आहे अनेक ठिकाणी कोविड केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात 1484 कोव्हिड केंद्र कार्यरत असून अजून त्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे, गोरेगाव येथे तसेच ठाण्यात ओपन हॉस्पिटल स्थापण्यात आले आहे. नागरिकांनी गावी जाणे टाळावे आहात तेथेच राहावे प्रवास करू नये असे मुख्यमंत्री म्हणाले.

परप्रांतियांच्या स्थळांतराबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, पायपीट करू नका, सरकार विशेष ट्रेन आणि वाहतूक व्यवस्था करीत आहे, थोडा संयम ठेवा. तसेच भूमिपुत्रांनी आता रोजगारासाठी निर्माण झालेल्या संधीचा फायदा घ्यावा व पुढे यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच शाळा, कॉलेज व शिक्षण व्यवस्था याबाबत प्रशासन नियमावली तयार करीत आहे योग्य वेळ आली की जाहीर करण्यात येईल. सध्या तरी लॉक डाऊन वाढविण्याशिवया पर्याय नाही म्हणून नागरिकांनी घरी रहा, बाहेर पडू नका तसेच अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडल्यास विशेष सावधानता बाळगावी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Source: TV9 Marathi