
राज्यातील बोर्डाच्या परीक्षांसह सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज्यांच्या मागणीनंतर केंद्रानं दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. याविषयी केंद्रानं नियमावलीही जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयी माहिती दिली.
सीबीएसई बोर्ड आणि अनेक राज्यांनी दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात केंद्राकडं विनंती केली होती. केंद्र सरकारनं चौथ्या लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यांकडून होणाऱ्या मागणीला परवानगी दिली आहे. राज्य शैक्षणिक मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांना परीक्षा घेण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी तसं पत्र राज्यांच्या सचिवांना पाठवलं असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याविषयी माहिती दिली.
“देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन लॉकडाउनच्या काळात परीक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यांना आणि इतर बोर्डांना दहावी बारावीच्या परीक्षा घेता येणार असून, सोशल डिस्टसिंगसह काही बाबींचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असं शाह म्हणाले.











