
देशात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी मागणी केली होती. दरम्यान आज पासून केंद्र सरकारने लोकल सेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असून आता मुंबईची लाईफ लाईन परत सुरू होणार आहे.
सुरुवातीला फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल मधून प्रवास करता येणार आहे. सामान्य नागरिक प्रवाशांना सध्या लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी नाही. ज्या प्रवाशांचे लॉक डाऊन दरम्यान रेल्वे पास संपले आहेत त्यांना मुदत वाढ देण्यात येणार आहे. रेल्वे विभागाच्या माहिती नुसार मुंबई लोकलच्या सर्व म्हणजे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे सेवा सुरू होणार आहे.
लोकल मधून एका वेळी फक्त सातशे प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बस वाहतूक वरील ताण थोडाफार प्रमाणात हलका होणार आहे.











