मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद: शेतकऱ्यांना फसवाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, 30 तारखेनंतर लॉक डाऊन उठणार नाही

मुंबई : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून बोगस बियाणे विक्री करणारांविरोधात कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातून बोगस  बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसुल केली जाईल.

एक तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करु. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांना सलाम करुयात, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही, काळजीपूर्वक काही गोष्टी सुरु करत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाची संख्या वाढत आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. काही जिल्ह्यांमधून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही, आपण काळजीपूर्वक सेवा सुविधा सुरु करतोय. आपण जे मिशन बिगेन अगेन सुरु केलंय पण धोका टळलेला नाही. आपण कात्रीत सापडलो आहोत. पण आपल्याला संकटावर मात करायची आहे. एखादी गोष्ट उघडली म्हणजे धोका टळलाय असं नाही, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका.

बोगस बियांणाच्या तक्रारी येत आहेत हे दुर्देवी.

उरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती दिली जाणार.

मी आषाढी वारीला पूजेसाठी जाणार. विठुरायाला साकडं घालण्यासाठी मी जाणार आहे.

दहिहंडी उत्सव स्वताहून रद्द केला. ही खरी सामाजिक जाणीव.

गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद

विसर्जनाची किंवा प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढू नका

मूर्ती लहान करण्याचा निर्णय कौतुकास्पद

प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करणारं देशातलं सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र असेल

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढं यावं

लढणं हे आपल्या रक्तात आहे, आता रक्तदान करुन आपला लढाऊपणा सिद्ध करा

रेमडेसिवीर आणि अन्य औषधं मोफत उपलब्ध करुन देणार

चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईत सुरु

अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही

अर्थचक्राला गती दिल्यानंतर कोरोना संख्या वाढणारच आहे

ज्येष्ठ डॉक्टरांनी काळजी घेऊन काम करावं

पाऊस आला की नवचैतन्यासोबत काही समस्याही घेऊन येतो, मात्र आपली तयारी सुरु आहे

या दिवसात अन्य रोगांचीही भीती आहे, त्यामुळं काळजी घ्या

उद्योजकांसाठी महाराष्ट्राचं दार उघडं, संकटामध्ये उद्योजकांना महाराष्ट्र आपला वाटतो. तुम्ही या पण भूमिपुत्रांना रोजगार द्या

शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर