
महाराष्ट्र सरकारने 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्त संस्थेने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना या संदर्भातील माहिती कळवली असून लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, ज्यामुळे प्रशासनावर ताण येईल यासाठी स्थानिक पातळीवर योग्य ती पाऊले उचलण्याची परवानगी देखील दिली आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक आहे. अशा वेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असून फक्त आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, अनावश्यक घराबाहेर फिरू नये असा सल्लाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला रविवारी केलेल्या निवेदनात दिला होता.
राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करतोय. मात्र, लॉकडाउन सुरुच राहणार आहे. त्यानंतर, सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे.
राज्यातील कंटोनमेंट झोन क्षेत्रात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.











