महाराष्ट्रात सोमवार पासून उघडणार धार्मिक, प्रार्थना स्थळं

मुंबईमध्ये मागील 7-8 महिन्यांपासून बंद असलेली प्रार्थनास्थळं अखेर सोमवारपासून उघडणार असल्याने सार्‍यांनीच सरकारचे आभार मानले आहेत. या निर्णयाचे जल्लोषात स्वागतही होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! यंदाचा सण आनंद, उत्साहासोबतच अधिक जबाबदारीने, काळजीने साजरा करायचा आहे. या आजाराचे संकट टळलेले नाही. त्यामुळे भेटीगाठींऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा द्या आणि स्वत:सोबत इतरांनाही सुरक्षित ठेवा.

महाराष्ट्रात मागील 8-9 महिन्यांपासून बंद असलेली सारी धार्मिक आणि प्रार्थना स्थळं (Religious Places)उघडण्यास राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. दिवाळी पाडवा (Diwali Padwa) म्हणजे 16 नोव्हेंबरपासून आता भाविकांना थेट मंदिरं (Temple) किंवा त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन देवदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही घोषणा करताना प्रत्येक भाविकाला मास्क घालणं बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोविड 19 संबंधित इतर नियमावलींचंदेखील पालन करावं लागणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गत जसा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने झाला तसा अनलॉकदेखील हळूहळू होत आहे. कोविड 19 ची परिस्थिती लक्षात घेऊन आता नागरिकांना कडक नियमांमधून शिथिलता देण्यात आली आहे. दरम्यान मंदिरं खुली व्हावीत यासाठी महाराष्ट्रात भाजपाने आक्रमक आंदोलनं केली होती. त्यासोबतच मनसे, वंचित, एमआयएम पक्षानेही वारंवार सरकारकडे प्रार्थना स्थळं खुली करण्यासाठी मागणी केली होती.