दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ

दहावी बोर्ड परीक्षेसाठी (Maharashtra SSC Exam) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी ही होती. मात्र तारखेत मुदतवाढ करण्यात आली असून 25 जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि फॉर्म न भरता आल्याने त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यात आज हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी चिंतेत होते. अनेक विद्यार्थी एकावेळेस अर्ज भरत असल्याने सकाळी 10 वाजेपासून वेबसाईट हँग झाली होती. त्यात अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरणे कठीण झाले होते. आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थी, पालक ,मुंबई मुख्यध्यापक संघटना यांनी बोर्डाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.

शिक्षण मंडळाने सर्व बाजूंचा साराचार विचार करुन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवून ती 25 जानेवारी ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता न करता ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज व्यवस्थित भरावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.