
बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये, यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ते वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भांतील राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दक्षता घेण्याच्या विविध सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेवून नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. पक्ष्यांमधील बर्ड फ्लू रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर 3 ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. ज्या भागात बर्डफ्लू रोगाची लागण नाही, अशा भागात अंडी व मांस 70 डिग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नाही. त्यामुळे गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बैठकीला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपास्थित होते.











