मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे – मुख्यमंत्री

कोविडचा लढा अजून संपलेला नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची सहावी बैठक पार पडली. या बैठकीत वाढता कोरोना, लॉकडाऊनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे, त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला आहे. इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहचणे आमचे उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरविणे सुरु असले तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावे आणि खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.