अकरावीचे लेक्चर्स शिक्षकांअभावी बंद

कोरोनामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लटकली होती. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अकरावीच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी यूटय़ूबच्या माध्यमातून मोफत ऑनलाइन वर्ग सुरू केले.

यासाठी राज्यातील 80 शिक्षकांची टीम तयार करण्यात आली. या लेक्चर्सना उपस्थित राहण्यासाठी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक होते. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाची लिंक देण्यात येत होती. मात्र 15 जानेवारीनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न मिळाल्याचे समोर आले आहे. 

कोरोना काळात अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाइन वर्ग शिक्षकांअभावी बंद पडले आहेत. या वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक उत्सुक नसल्याचे समोर आले आहे. काही शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील अकरावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे या वर्गांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आपापल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यास गुंतले आहेत.