स्वीडिश कार निर्माती कंपनी व्हॉल्वो (Volvo) मार्फत दुसरी इलेक्ट्रिक कार सी 40 रिचार्जचे (C40 Recharge) अनावरण

सिंगल चार्जवर 420 KM धावणार

देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

दरम्यान, Volvo कंपनी त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. स्वीडिश कार निर्माती कंपनी व्हॉल्वोने (Volvo) आज त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार सी 40 रिचार्जचे (C40 Recharge) अनावरण केले आहे. यापूर्वी कंपनीने व्होल्वो एक्ससी 40 रिचार्ज (Volvo XC40 Recharge) ही इलेक्ट्रिक कार बाजारात सादर केली आहे. नवी कार XC40 रिचार्जच्या मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केली जाऊ शकते आणि या कारचे उत्पादन कंपनीच्या बेल्जियममधल्या घेंट येथील कारखान्यात 2021 च्या अखेरीस सुरू केले जाऊ शकते.

व्हॉल्वोच्या म्हणण्यानुसार, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 420 किमीपर्यंतची रेंज देते. त्याचबरोबर, ही कार अवघ्या पाच सेकंदात शून्यापासून ताशी 100 किलोमीटरपर्यंतचा वेग पकडू शकते आणि या कारचं टॉप स्पीड ताशी 180 किलोमीटर इतकं आहे.