नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन; सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी संचारबंदी करण्यात आलीय. तसेच मुंबई आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कडक निर्बंध लादण्यात आलेत. नाशिक आणि मालेगावमध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हााधिकाऱ्यांनी दिलीय.

नाशिक, निफाड, मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा बंद राहणार आहेत. शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. विशेष म्हणजे 15 तारखेनंतर शहरात कोणतीही लग्न समारंभ होणार नाहीत. बार, खाद्यपदार्थांची दुकानं अशी ठिकाणं 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 9 सुरू ठेवण्यास परवानगी आहे.

सामाजिक, राजकीय, धार्मिक समारंभांवर पूर्णतः बंदी लादण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत उघडी असतील. शनिवार आणि रविवार सर्व धार्मिक स्थळं बंद राहणार आहेत. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, कोरोना जनजागृती सप्ताहही राबवण्यात आलाय.

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई कठोर होणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह जर इतरत्र फिरताना दिसला, तर गंभीर कारवाई केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.