डिजिटल मार्केटिंग समज आणि गैरसमज – श्री सचिन पिळणकर

डिजिटल मार्केटिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची (वेबसाईट, वस्तू, माहिती, पोस्ट) इंटरनेटवर केलेली प्रसिद्धी

सध्या डिजिटल मार्केटिंग च्या नावाने क्लासवाले लाखभर पैसे घेत आहेत आणि पालक आपल्या मुलासाठी पैसे देखील भरत आहेत, पण हा कोर्स खरच उपयोगाचा आहे का? हे समजवण्यासाठी हा खटाटोप.

1 लाख कमवा – हे फक्त आपण जर या क्षेत्रात १० पेक्षा जास्त वर्षे काम करीत असाल तरच शक्य आहे, ते देखील तुमच्याकडे कायमस्वरूपी काही मोठ्या कंपनीची कामे असतील तर.

फेसबुकवर डिजिटल मार्केटिंग कोर्समध्ये एखादी जाहिरात (photoshop मध्ये बनवून) तिला फेसबुक वर प्रसिद्धी कशी दिली जाते ते शिकविले जाते.

फेसबुक वर प्रसिद्धी करताना तुम्हाला पद्धतशीरपणे कशी जाहिरात करायची ते शिकविले जाते.

यामध्ये आपण करीत असलेल्या जाहिरातीसाठी खालील गोष्टींची माहिती दिली जाते.
१. तुमचे जाहिरातीचे बजेट किती आहे म्हणजे तुम्ही किती खर्च करू शकता?
२. कोणत्या वयाच्या लोकांसाठी तुम्हाला जाहिरात करायची आहे?
३. कोणत्या विशीष्ट आवड असलेल्या लोकांसाठी तुम्हाला जाहिरात करायची आहे?
४. कोणत्या ठिकाणासाठी, शहरासाठी, देशासाठी तुम्हाला जाहिरात करायची आहे?
५. दिवसाप्रमाणे तुम्ही जाहिरातीचे बजेट कसे ठरवाल?
६. जाहिरात किती दिवस व महिने चालावी कि कायम चालूच राहावी हे ठरविणे.
७. फेसबुकवर जाहिरातीचे पेमेंट कसे केले जाते?
८. हे काम घेताना ग्राहकाला किती पैसे चार्ज करायचे?
९. ग्राहकाला कामाचे स्वरूप कसे सांगायचे?
१०. ग्राहकाला डिजिटल मार्केटिंग किती आवश्यक आहे हे कसे समजावयाचे?


यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट हि कि जेव्हा एखादी कंपनी/व्यक्ती तुम्हाला जाहिरात करण्यासाठी रु. १०,०००/- देते तेव्हा ती त्या जाहिरातीपासून किमान रु. २०,०००/- पर्यंतचा फायद्याची अपेक्षा करते, जर त्या कंपनी/व्यक्तीला तसा अपेक्षित फायदा झाला नाही तर पुढील महिन्यात ती जाहिरात बंद करते.

एखाद्या जाहिरातीपासून कंपनीला फायदा होतो देखील परंतु त्यासाठी तुम्ही काय जाहिरात करत आहात हे देखील महत्वाचे आहे. कारण जर लोकांना आपण जाहिरात करत असलेल्या गोष्टीत काहीच रस नसेल तर आपली जाहिरात व्यर्थ जाते.
उदा. समजा आपण घरी एखादी कापडाची पिशवी बनविली असेल व त्याची जाहिरात फेसबुकवर करत आहात. तर तुम्हाला खालील गोष्टींचा विचार करायला हवा

१. लोक तुमची पिशवी का घेतील?
२. तुम्ही लिहिलेली पिशवीची माहिती लोक वाचतील का?
३. लोकांकडून तुम्ही पिशवीचे पेमेंट तुम्ही कसे स्वीकाराल?
४. पिशवीची डिलिव्हरी कशी कराल?
५. चुकून एखादी पिशवी खराब निघाली तर ती परत घेऊन नवीन पिशवी द्याल कि पैसे परत कराल?

Flipkart, Amazon वर एकापेक्षा एक डिझायनर पिशव्या मिळत असताना लोक तुमची पिशवी का घेतील? तसेच या वेबसाईट वर वरील सर्व मुद्यांसाठी योग्य पर्याय आहे.

यामुळे आपण जाहिरात करून देखील आपली पिशवी फेसबुकवर विकली जाणार नाही त्यामुळे जाहिरातदाराला त्याचे पिशवी विकली न गेल्याने जाहिरातीचे पैसे देखील परत मिळणार नाही.

काम तसे जास्त मेहनतीचे नाही, पण आपण केलेल्या जाहिरातीचा ग्राहकाला किती फायदा होईल याची खात्री तुम्ही देऊ शकत नाही.

त्यामुळे फेसबुकवर आपण जर जाहिरात करत असाल तर सध्याच्या काळात ‘एखाद्या माहितीचा’, ‘फेसबुक पोस्टचा’ तसेच तुमच्या वेबसाईटचा प्रसार करायचा असेल तरच फेसबुक जाहिरातीचा फायदा होतो परंतु या जाहिरातीमधून तुम्हाला आर्थिक फायदा होईल कि नाही हे सांगता येत नसले तरी त्या गोष्टीची प्रसिद्धी होईल हे खात्रीने सांगता येते.

– सचिन पिळणकर
(IT तज्ञ, वेब डेव्हलपर)
मो. ९८९२२४१४३३ / इमेल – avakashvedh@gmail.com