
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल (१४ मार्च) तब्बल १६ हजार ६२० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतोय. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होईल की काय? अशी भीती सर्वसामान्य जनतेला सतावतेय.
राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. “ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या तीन सूत्रांवर काम करत आहे. सर्व सामाजिक, शासकीय कामांना निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यू , लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मुंबई आणि राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही. पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार”, अशी भूमिका राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना रूग्ण संख्या वाढतेय. संसर्ग वाढतोय, ही वाढ मागच्या तुलनेत कमी आहे. मृत्यूदर कमी होतोय, संसर्ग मात्र वाढतोय. सध्या रूग्णालयात बेड उपलब्ध आहे. लसीकरणाच प्रमाण वाढविण्याची गरज आहे. आतापर्यंत 30 लाख लोकांपर्यंत लसीकरण झाले आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.











