राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत पुन्हा बिघडली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची रविवारी (28 मार्च) सायंकाळी अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर तातडीने त्यांना मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाले. ज्यामुळे उद्या (31 मार्च) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु, आज (30 मार्च) पुन्हा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

“शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. उद्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु, पवार यांना अचानक आज त्रास होत असल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे”, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.