
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील नंदीग्रामसह 30 विधानसभा मतदारसंघातील प्रचार मंगळवारी संपला. गुरुवारी (दि. 1) पश्चिम बंगालमध्ये दुसऱया टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तसेच आसाममधील 39 मतदारसंघात मतदान होईल.
नंदीग्राममध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी असा सामना आहे. अधिकारी हे तृणमूल सोडून भाजपमध्ये गेले आहेत. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या पायाला जखम झाली. त्यांनी व्हिलचेअरवर बसून एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
नंदीग्राम मतदारसंघात त्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहे. मंगळवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी व्हिलचेअरवर बसून प्रचंड रोड-शो केला. दुसरीकडे अधिकारी यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रथामधून रोड-शो झाला. नुकतेच भाजपवासी झालेले प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती या रोड-शोमध्ये सहभागी झाले होते.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होत आहे. शनिवारी पहिला टप्पा पार पडला. गुरुवारी (दि. 1) बंकुरा, पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर आणि दक्षिण 24 परगणा या चार जिह्यातील 30 मतदारसंघात मतदान होणार आहे.
172 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद होईल.
30 मतदारसंघात 10620 मतदान केंद्र आहेत. सर्वच मतदान केंद्र संवेदनशील म्हणून निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत.
केंद्रीय सुरक्षादलाच्या तब्बल 651 कंपन्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आसाम विधानसभेच्या 160 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे. शनिवारी पहिला टप्पा झाला. गुरुवारी 39 मतदारसंघामध्ये दुसऱया टप्प्यासाठी मतदान होत आहे.
आसाम निवडणूक प्रचारात ‘सीएए’ कायदा प्रमुख मुद्दा बनला आहे.
भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘काँटे की टक्कर’ अनेक मतदारसंघात पाहायला मिळत आहे.










