
एकीकडे कोरोनाचा झपाटय़ाने होत असलेला फैलाव, त्यात डबल म्युटेंटने हातपाय पसरल्यामुळे देशाची चिंता वाढली आहे.
याचदरम्यान इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) मंगळवारी कोव्हॅक्सिन लसीबाबत दिलासादायी दावा केला. कोव्हॅक्सिन लस जबरदस्त प्रभावी असून कोरोनाचा डबल म्युटेंट व्हेरिएंटही नष्ट करण्याची क्षमता या लसीमध्ये आहे, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
दरम्यान, कोविशिल्ड लसही प्रभावी असल्याचा दावा सिरम इन्स्टिटय़ूटने केला आहे.
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस ब्राझील, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंटवरही परिणामकारक आहे. ही लस सर्व व्हेरिएंटपासून रक्षण करते, असे आयसीएमआरच्या अभ्यासात आढळले आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेला विविध व्हेरिएंट्स जबाबदार आहेत.
जवळपास 10 राज्यांत आढळलेला डबल म्युटेंट कोरोना सर्वाधिक घातक आहे. डबल म्युटेंट वेगाने पसरतो. तसेच खूप कमी वेळेत रुग्णाच्या आरोग्यावर प्रचंड आघात करतो. अशा परिस्थितीत कोव्हॅक्सिन लस कोरोनाला संपवण्याच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.
- क्लिनिकल ट्रायल्सच्या तिसऱया टप्प्यातील निष्कर्षानुसार, कोवॅक्सिन 81 टक्क्यांपर्यंत परिणामकारक सिद्ध झाली आहे. तिन्ही टप्प्यांमध्ये 27 हजार स्वयंसेवकांवर लसीचा प्रयोग करण्यात आला, असे भारत बायोटेकचे चेअरमन डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले.
- कोवॅक्सिन लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाणही कमी आहे. ही लस वेरो सेल्सपासून बनवली आहे. तसेच ती 2 ते 8 अंश सेल्सिअसमध्ये स्थिर राहते आणि रेडी-टू-यूज लिक्विड फॉर्मेशनमध्ये तिची वाहतूक केली जाते. सध्याच्या पुरवठा साखळीसाठी हे फार उपयुक्त आहे.











