Nashik: Black Fungus च्या भीतीने चक्क परिसरातील झाडे तोडत आहेत लोक

कोरोना विषाणूनंतर (Coronavirus) आता देशात ब्लॅक फंगस (Black Fungus) आजार हात-पाय पसरत आहे.

काळ्या बुरशीची वाढती प्रकरणे लक्षात घेता अनेक राज्यांनी त्यास साथीचा रोग जाहीर केला आहे.

सध्या भारतात 28,252 म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) प्रकरणांची नोंद झाली आहे. 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काळ्या बुरशीच्या संसर्ग आढळून आला असून, महाराष्ट्र आणि गुजरात येथे सर्वाधिक रुग्ण आहेत.

आता या आजाराबाबत लोकांमध्ये एक नवीन भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये (Nashik) अशी काही प्रकरणे आढळली आहेत, जिथे काळ्या बुरशीच्या भीतीने लोक झाडे तोडत आहेत.

लोकांचा असा विश्वास आहे की आजूबाजूला झाडे असल्यास आर्द्रता वाढते, परिणामी बुरशीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. म्हणूनच लोक झाडे तोडत आहेत. अशा परिस्थितीत वन विभाग लोकांचा हा भ्रम दूर करण्यासाठी पुढे आला आहे.

नाशिक वनविभागाचे उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले की, या रोगाचा झाडाशी काही संबंध नाही. काळ्या बुरशीच्या आजाराच्या वाढीमागील कारण म्हणजे शरीरामधील प्रतिकारशक्ती कमी असणे हे आहे.

पंकज गर्ग यांनी निवेदनात म्हटले आहे की, काळ्या बुरशीच्या भीतीमुळे लोक झाडे तोडत असल्याचे ऐकले आहे. मी हे स्पष्ट करू इच्छित आहे की, या रोगाचा झाडाशी काहीही संबंध नाही. कमी प्रतिकारशक्ती, वारंवार स्टीम घेणे, एकच मास्क बराच काळ वापरणे आणि स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर यामुळे ब्लॅक फंगसचा संसर्ग होतो.