मला भावलेल्या शांतताप्रिय कॅनडा: डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 8

कॅनडातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन आणि शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा

तसे पाहिल्यास कॅनडातील आजचे जे नागरिक आहेत ते बाहेरच्या देशातून येथे येऊन स्थायिक झाले आहेत. त्यांचा येथे येऊन स्थिरस्थावर होण्याचा कालावधीत काही फरक असू शकतो.

सर्व साधारणत: आज श्वेतवर्णीयांची कुटुंब रचना,त्यांची जीवन प्रणाली, फॅमिली व्हाल्यूज कशा असतात ते समजून घेताना तसेच भारतीयांच्या कुटुंब संस्थेच्या ज्या संकल्पाना आहेत त्यातील फरकही आपण लक्षात घेतला पाहिजे.
कॅनडात आम जनतेचे राहाणीमान उच्च श्रेणीतील आहे यात काही शंकाच नाही.प्रगती,उन्नतीची,अर्थ, व्यापार उद्योगातील समान संधी मुळे जीवनमान निश्चितच उंचावलेले असून ते कौतुकास्पद आहे.


मर्यादित कुटुंबातील सदस्यांची संख्या, पती,पत्नी दोघेही कमवते असल्याने आर्थिक सुबत्ता ही आलीच.मुलांचे शिक्षणासाठी येथे प्रवेश मिळण्याची येथे चिंताच नसते.सर्व शाळा शासकीय असल्याने डोनेशन चीन भानगड नाही. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातील स्कूल मध्ये तुमच्या पाल्यास प्रवेश मिळणारच. येथे युनिफॉर्म नसतोच, प्रॅक्टीकली शिक्षणावर अधिक भर,विद्यार्थ्यांवर कल लक्षात घेऊनच महाविद्यालयातील पुढील शिक्षणाची शिफारस व खेळांची आवड पाहून त्यांना उत्तम संधी दिली जाते.


यांची मुलामुलींना वयाच्या सोळाव्या वर्षी ड्रायव्हिंग लायसन्स मिळते मात्र तत्पूर्वी लेखी परीक्षा द्यावी लागते.असे लायसन्स असलेल्या ड्रायव्हिंग करताना पक्का लायसन्स धारी सोबत असावा लागतो.त्याला हायवेवर व्हेवीकल चालविण्यास परवानगी नसते.पक्के लायसन्स अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर कठोर परीक्षा घेऊनच दिले जाते.मग लायसन्सधारीना कुठेही विहार करावयास मोकळीक असते.


अठरा वर्षी मुलांनी स्वतःच्या अस्मितेची उमज आलेली असते.ही मुले अर्थार्जन करू लागतात, हाॅस्टेल, किंवा मित्रमंडळींबरोबर घर भाड्याने घेऊन राहतात, पालक वर्गही जरूर पुरतेच लक्ष देतात फारसे हस्तक्षेप करीत नाहीत. आपल्या आवडीनुसार डिप्लोमा,पदवी घेऊन त्याच ट्रेडमध्ये जाॅब करणे सुरू करतात याचवेळी आपल्या जोडीदाराची निवड करण्यासाठी डेटिंग सुरू करतात याठिकाणी त्यांच्या लव्ह अफेअर मध्ये आईवडीलांनी डोकावणे त्यांना अजिबात आवडत नाही.यथावकाश रितसर लग्न होते. जोपर्यंत जमते तो पर्यंत ते टिकते येथे साता जन्माचे आणाभाका कोणी घेत नाहीत किंवा वटसावित्रीचा व्रत करीत नाहीत. तोपर्यंत स्वतंत्र छोटे घर झालेले असते.पॅरेंट दुरूनच पाहात असतात, औपचारिक संबंध, सणानुसार, कौटुंबिक कामासाठी भेटीगाठी चालू असतात.

याचा अर्थ असा नाही कि त्यांचे कौटुंबिक ऋणानुबंध संपून गेले आहेत, खंर तर पिढीगणिक जो तो आपली स्पेस जपत असतो.प्रत्येकालाच आपआपले छंद, आवडीनुसार आपले आयुष्य व्यतीत करता येते.त्यामुळेच जनरेशन गॅप, दोन पिढीतील अंतर वैगरे प्रश्न उपस्थित होत नाहीत. मुलांनाही आईवडीलांच्या अपेक्षांचे ओझे व्हावे लागत नाही.इथपर्यंत नोकरी,व्यवसायातून निवृत्त झाल्यावर पालक मोठे घर विकून छोट्या घराची खरेदी करून त्यामध्ये शिप्ट होतात.

आपल्या पाल्यांकडे तसेच झालेल्या नातंवडांचे प्रसंगानुरूप कोड कौतुक चालूच असते. कॅनडात सर्व ज्येष्ठ नागरिकांची काळजीच नव्हेतर त्यांच्या संपूर्ण आरोग्याची,ज्यांना गरज आहे त्यांना भोजनाची, राहाण्याची व्यवस्था केली जाते.सामुदायिक निवासस्थानातून अशा सोयी सुविधा दिल्या जातात. नबंर 911 डायल केला कि तुमच्या दाराशी अॅब्युलन्स हजर असते.अशा प्रकारे सवलती उपलब्ध असल्याने कोणी भविष्याची फुकाची चिंता करीत बसत नाही.

हा असाच काही जीवन शैलीचा छापील नियम नाही.यालाही सन्माननीय अपवाद असतातच.काही आपल्याच घरी आयुष्याच्या सांयकाळी निवांत पणे आपले छंद जोपासत मित्रमंडळींबरोबर मैफली जमवून कधी हाॅटेलिंगचा इत्यादीचा आनंद घेत असतात.


येथील हवामान तसा आल्हाददायकच असतो.बर्फाच्छादित ऋतू मध्ये आप आपल्या घरासमोरील बर्फ साफ करण्याची जबाबदारी घरमालकाची असते.त्यासाठी हा साचलेला बर्फ साफ करण्यासाठी चौकोनी कुटुंब हातभार लावतात. गार्डन कामाचा छंद, आपल्या आवडत्या श्वान सह सकाळ,संध्याकाळी फेरफटका मारून स्वता: ला फीट ठेवणे थोडक्यात बघते दिनोका गम न करते हुये वर्तमान दिन एन्जॉय करके सबकुछ कारवाॅ चलता रहता है! इथे नसते उद्याची चिंता, नसते भूतकाळाची खंत फक्त असोशी असते ती निव्वळ आनंदात जगण्याची.


आता भारतीयांचा अनेक वर्षांपासून वास्तव्य असले तरी काही भारतीय विवाह संस्थेचा आदर राखून काळानुरूप बदल करून नव्याचे स्वागत करतानाच आपल्या संस्कृतीचाही योग्य ती आन, बान ,शान राखून आहेत. अशा प्रकारे या शांतताप्रिय कॅनडात लोक आपले दिवस आनंदात घालवित आहेत.


डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.