मला भावलेला शांतताप्रिय कॅनडा : डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 16 (मिसिसॉगातील जीवनशैली – भाग 3)

मिसीसागातील जीवनशैली, राहाणीमान आणि एका कुटुंबावर येणारा सरासरी खर्च ( भाग 3)

Mississauga Farmers Market

मिसीसागात आणखीन एका मार्केटचा उल्लेख करावा लागेल तो फार्मर्स मार्केटचा. हा काहीसा दूरस्थ आहे. या मार्केट मध्ये शेतकरी आपल्या शेतात तयार झालेले उत्पादन थेट मार्केट मध्ये आणून विकतात. सर्व प्रकारच्या भाज्या, कांदे, बटाटे, लसूण, आद्रक, फळे, अनंत प्रकारची फुले, कडधान्य, अशा शेतीवरील पिकणारी सर्वच प्रकार येथे मुबलक प्रमाणात ताजे ताजे आणि ते पण काहीशा कमी दरात मिळतात. खूप प्रचंड मोठे मार्केट आहे. पायी चालून दमछाक होते. एक प्रकारचे उत्पादन संपले कि दुसरे सुरू.भाजीपाळा, नतंर कडधान्ये ,फळे फुले सर्वच स्वतंत्र!

भारतीय शेतकरी आपल्याकडील वापरण्यात येणारी शेतीविषयक अवजरेही खरेदी करतात. येथे शीख बांधव काही प्रमाणात शेतीही करतात. प्रत्येक जण आपल्या बॅकयार्ड मध्ये बागकाम, गार्डनींगचा आनंद घेत असतातच. शिवाय त्यांच्या साठी भारतीय पध्दतीची भांडीही विक्री साठी बाजारात उपलब्ध असतात.

The Sikh Farmers of Canada

या अतिविशाल मार्केट मधील स्वच्छते विषयी काय लिहावे ? कुठेही कचरा, गलिच्छ पणाचा नामोनिशाण नाही. अतिशय स्वच्छ अशी स्वच्छतागृहे, पोटपूजा करण्यासाठी सर्व प्रकारची उपहारगृहे, इमरजन्सी साठी मेडिकल सुविधा. किती आणि काय काय सांगावे तेव्हढे कमीच.

मिसीसागातील लोक जीवनाचा आनंद भरभरून घेत असतात हे तितकेच महत्त्वाचे.रोज सकाळी आणि सायंकाळी वाॅक घेणे हा त्यांचा जीवनशैलीचा अविभाज्य भागच असावा आणि याचे एक कारण म्हणजे येथे साडेआठ पर्यंत लख्ख प्रकाश असतो त्यामुळेच वाॅक घेण्यासाठी वेळ अॅडजस्ट करता येते. या वाॅक साठी मिसीसागातील नदी काठी घनदाट वनश्री, मेपलच्या डौलदार वृक्षराजीतून ट्रेल तयार केलेले आहेत. सुंदर, स्वच्छ निट नेटके.नदीत बदके त्याचे भक्ष्य शोधत विहार करतात तर आपण कानात हेडफोन लावून अप्रतिम गाजलेली मराठी गीतांचा आनंद घेऊ शकता.

The Canadian Sports Facilities

अनेक ठिकाणी विस्तीर्ण मैदाने आहेत, शासकीय पार्क आहेत. त्यात फूटबॉल, बास्केटबॉल, लाॅग टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स, लहान मुलांना रमण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था वेगळीच, येथेही स्वच्छतागृहे असतात. स्विमिंग पूल साठी मात्र माफक दर आकारण्यात येतो.

अलिकडे कॅनडात क्रिकेट ही लोकप्रिय होऊ लागला आहे.क्रिकेट प्रेमी या मैदानावर आपली आवड पूरी करतात. काही मैदानात खेळ पट्टयाही तयार करण्यात आल्या आहेत.

Cricket in Canada

आता तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील टी 20 मध्ये कॅनडा संघाने अधिकृत प्रवेश मिळविला आहे. कॅनडाचा हा क्रिकेट संघ संमिश्र वंशाचा असलेला दिसतो आणि ते साहजिकच आहे.

क्रमश: डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन