
*बफेलो ग्रोव्ह ,कॅसलवूड मधील माझी विसावयाची ठिकाणे*
आज थंडी जास्तच जाणवत होती.मी बॅकयार्ड मध्ये कधी उन येतयं त्याची वाट पाहत होतो पण गर्द वृक्षराजीतून कोवळी किरणे येण्यास अमंल आळसच करीत होती.मी फय्याज आणि अबू ब्रदर्सनी गायिलेला खुस्रो लिखित *छाप तिलक*ऐकण्यात तल्लीन झालो होतो.

आज कुठेच जाण्याचे विशेष असे काहीच ठरले नव्हते.मी पण सुशागत होतो.अचानक राहुलनी इंडियन ट्रेल्स पब्लिक लायब्ररीत जाऊ या म्हटल्यावर मी प्रफुल्लित झालो.
येथे पब्लिक लायब्ररीची उत्कृष्ट सोय असते.अशाच इंडियन ट्रेल्स पब्लिक लायब्ररीत मध्ये चार किलोमीटरच्या अंतरावर गेलो.या ग्रंथालयाची भव्य इमारत विद्यापीठाच्या इमारतीला साजेल एव्हढी मोठी होती.माझ्या नाती अवनी ,नीवाला पारूल त्यांच्या स्कूल टेस्ट तयारी साठी अगोदरच घेऊन गेली होती.माझ्यासोबत उषाही आली होती.
या ग्रंथालयात निरनिराळे अनेक विभाग होते.विषयानुसार गणिता पासून ते मानववंशशास्त्र, इतिहास, भूगोल, ख्यातनाम साहित्यिकांची ग्रंथसंपदा येथे विराजमान होती.नवीन आलेले ग्रंथ त्यांची ,वर्षभरातील बेस्ट सेलर्स पुस्तकाची माहीती ठेवण्यात आली होती.
मुलांसाठी स्वतंत्र अनेक दालने,सायन्स विषयाची,तेथे कौशल्य आधारित प्रयोग करण्याची किती सोयी होत्या.या सर्वाना मदत करणार्यां हसतमुख सहाय्यक तरूणी, सर्वत्र निरव शांतता.येथे जर काही वार्तालाप करायचे असेल तर दोन तासासाठी छोटीशीच रूमही मिळते.वायफाय् ,इंटरनेट मोफत, आरामशीर सोफे,खुर्चींची व्यवस्था,कितीही पुस्तके घेऊन लायब्ररीच्या वेळेपर्यंत वाचन करा,मेंबरशीप घेणे जरुरीचे पण ती मोफतच.माझ्या सारख्या वाचनवेड्याला आणि लेखागारात रमणाऱ्याला अजून काय पाहिजे होते! मी शिकागो वरील ग्रंथ घेऊन संदर्भ शोधून काढले.
राहुलनी मला वाटेवरल्या भव्य पार्कवर सोडले.येथे तर प्रत्येक खेळ प्रकारच्या मैदानावर तरुणाई घाम गाळीत होती.कोणी सायकलिंग, कोणी रनिंग, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, किती प्रकार! जरा छोट्या बच्चे कंपनीचा विभाग, तो तर हाऊसफुल्ल.
येथे आणखीन मजा म्हणजे भारतीय वंशाचे बरेसचे मराठी कुटुंबातील सदस्य असतात. त्यांच्याशी गप्पाष्टाकात रमता येते.विषयाला काहीच तोटा नसतो.येथे मुलांच्या शाळांना सुट्टी असल्याने बरेच जण आप आपल्या पालकांना हक्काने बोलावतात हवामानही अनुकूल असते.माझ्याही काही सिनियर्स बरोबर ओळखी झाल्या.
बाजूलाच गोल्फ मैदान मैदान होते.तेथे सर्व इतमामात, लवाजम्यासह, गोल्फ खेळाच्या आयुधे घेऊन मंडळी तल्लीन झाली होती.या खेळातले मला फारसे समजत नाही म्हणून माझे मन रमत नाही.
शेवटी माझ्या वाॅक चा सध्या जो नियमित उपक्रम चालू आहे तो पुर्ण करण्यास निघालो.येथे पाथ वे वर भेटणारे प्रत्येक जण एकमेकास अभिवादन करीत असतात. सोबत त्यांच्या श्वान असतोच.ते त्यांच्या श्वानाच्या गतीने आणि त्याच्या मर्जीनुसार चालत असतात, शी सू उरकतात.त्यांच्या श्वानाची तारीफ केल्यावर त्यांची कली खुलते ती बघण्यासारखी असते.
असा उनाड ठरणारा दिवस सत्कारणी ठरला आणि मला काही विसाव्याची ठिकाणे गवसली.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











