
माझी थाऊजंड आयलंडची क्रुझ मधून सैर….. एक विलक्षण अनुभव
अमेरिकेतील पहिल्याच भेटीत जी काही प्रेक्षणीय स्थळे डाॅ. सर्जेराव देशमुखांबरोबर पाहिली त्यामध्ये थाऊजंड आयलंड ट्रीप विषयी थोडे सांगतो आहे. ही सैर अविस्मरणीय होती.खूप मजा आली.
आम्ही चीनी कंपनीकडून आयोजित केलेल्या तीन दिवसीय ट्रीप मध्ये सहभागी झालो.डाॅ.प्रतिभाताईनी आम्हाला न्यूयॉर्क मधील चायना टाऊन पर्यंत कारनी सोडले.( डाॅ.सर्जेरावाच्या पत्नी) आणि आमची ट्रीप सुरू झाली.
आरामशीर बसमध्ये *चीनी लोकसंख्या जास्त होती* पाचसहा भारतीय होते. त्यात मायबोली मराठीतून जागर करणारे आम्ही दोघेच पामर! या चीन्यांच्या इवलाश्या डोळ्याची जितकी जलद उघडझाप होत होती तितकीच तोंडाची होत होती.बस सुरू झाल्यापासून त्याचे खाणे सुरू झाले होते.मी कुतूहल म्हणून त्यांनी झुरळे फ्राय करून आणलीत काय ते पाहात होतो.फक्त डोळ्यांच्या फटीतूनच गपचूप.

आमची बस कम्फर्ट ब्रेक साठी थांबली नि बर्गर घेऊन पोटपूजा झाली.या अमेरिकेन लोकांचे सर्वच किंग साईज.कटिंग असे काहीच नसते. आता बस न्यूयॉर्कच्या डोंगराळ भागातून जात होती.आल्हाददायकच वातावरण होते.पावसाची हलकीशी सर येऊन गेली होती.हवेत खूपच गारवा होता.मी सृष्टीची विविध रूपे पाहात होतो.आमची आरामदायक बस अतिशय सुंदर, सुरेख चौपरी मार्गावरून धावत होती.फाॅल सिझन सुरू झाला होता.त्यामुळे नजारा बदलत होता.
आता थाऊजंड आयर्लंड म्हणजे काय ते प्रथम सांगतो.अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा या दोन देशांच्या दरम्यान पांच मोठी सरोवरे आहेत त्यातील ऑटोंरिया सरोवरात एका उथळ भागाच्या तळावर हजारो उंचवटे नैसर्गिक रित्या निर्माण झालेत आणि जे बेट बाराही महिने पाण्याच्या वर राहातात तसेच या बेटावर किमान दोन वृक्ष वर्षभर जीवंत राहातात आणि त्यावर थोडी बाग असते त्यांना बेट असे संबोधतात. ही संख्या हजारांहून अधिक आहे म्हणून या बेटांच्या समूहाला थाऊजंड आयलंड असे नामकरण करण्यात आले.

शंभर दिडसे वर्षापूर्वीच अनेक लोकांचे लक्ष या बोटांकडे गेले आणि गर्भश्रीमंतांनी ती विकत घेऊन बंगले बांधले आणि उन्हाळ्यात येथे येऊन मौज मजा करण्यासाठीच एक निसर्गरम्य, निरव शांतता असलेले ठिकाण शोधले.थंडीत मात्र बर्फ गोठत असल्याने यातायात करणे कठीण जात असते.
आता आम्ही *अंकल सॅम बोट* या टूर्स कंपनीच्या मोटार बोटींमधून जलपर्यटन सुरू केले.आम्हाला रेनकोट घालावयास दिले. आणि त्यांनी हसतमुखाने स्वागत करून ज्या बेटाजवळ बोट जात होती त्याची वैशिष्ट्य काय आहेत ते सांगत होते.ते सांगून झाल्यावर पुन्हा संगीताचे सूर कानावर पडत होते. प्रत्येक बेटाचे निरिक्षण करीत दिडएक तास फेरफटका झाला होता.मध्येच पाण्याचे शुभ्र तुषार उडत होते त्यांच्यापासून बचाव होण्यासाठीच रेनकोट दिले होते.थंडीही वाढली होती.

येथील प्रत्येक बेटावरील इमारती या वास्तु शिल्पकलेचा नमुना वाटतो.कोणी किल्ल्याचा आकार दिलाय तर काहीनी भयावह भूतबंगल्याचा लूक दिला आहे.ज्यांची त्यांची आवड,मालक ते,आपण फक्त प्रेक्षक!
आमचा गाईड कोणता बंगला कोणत्या नट, नटीचा,सेलेब्रिटीजचा आहे, तेथे कुठले शूटिंग,कार्यक्रम झाले,घटना घडून गेल्या याचे रसभरित वर्णन करीत होता.मला यापेक्षा ते निळेशार, पारदर्शी पाणी अधिक भावत होते.

आमचा गाईड एकदा म्हणाला तुम्ही आता विना पासपोर्ट, विना व्हिजा कॅनडातून प्रवास करीत आहात.कारण आमची बोट कॅनडातील हद्दीतून जात होती.
येथील एका बेटावर स्वामी विवेकानंद एक महिनाभर ध्यान धारणेसाठी येऊन राहिले होते असेही सांगितले.अशी ही अमेरिकेतील सहस्त्रदिपांची ट्रीप अविस्मरणीय झाली.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











