यापूर्वीच्या लेखात कोल्हापूरच्या अभिलेखागारात किती महत्वपूर्ण अभिलेख आहेत आणि ते विषयांशी संबधित आहेत त्याबाबत माहिती घेतली आहेच. आज हे अभिलेख ज्या इमारती मध्ये ठेवण्यात आले आहेत तिच्या इमारत निर्मीतीचा इतिहासही समजून घेऊ या !
कोल्हापूर नगरीमध्ये महाराणी ताराबाई यांनी स्वताचे वारणेचा तहानुसार स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंतर राजसत्तेला आवश्यक आणि अनुरूप अशा इमारती तयार करण्यात आल्या. ही प्रक्रिया अनेक वर्ष चालूच होती. पुढे 1874 मध्ये करवीर शहरात आणि पन्हाळगडावर काही नव्या इमारती निर्माण झाल्या. पुढे राजर्षी शाहूमहाराज कालखंडात अनेक प्रशासकीय ह्यष्टीकोनातून तहसिल कचेरी, न्यायालये, लष्करी बराकी, सदर आमीनची कचेरी, पागा, हत्तीमहाल, *या बरोबरच पुराभिलेखागारासाठी खास बांधलेल्या रेकॉर्ड ऑफिसच्या दगडी इमारतीचाही समावेश होतो* आज याच इमारतीमध्ये हे सर्व ऐतिहासिक अस्सल दस्तावेज सुरक्षित जतन करून ठेवण्यात आले आहेत.
कोल्हापूर टाऊन हॉल
टाऊन हॉलच्या समोर व तहसिल कार्यालयाच्या बाजूला तत्कालीन संस्थानानी ही अत्यंत भरभक्कम मजबूत दगडी इमारत अभिलेखांच्या ह्यष्टीकोनातून उपयुक्त अशी बांधण्यात आली आहे. आजतागायत ती ताठ मानेने अभिलेखांचे संरक्षण करीत आहे.कोल्हापूरातील एक ज्ञानदानाचे महत्वाचे केंद्र झाले आहे.
आत मध्ये खेळती हवा, वायूविजनाची सुखकारक रचना, अग्नी, वारा, धुळ इत्यादी घटकांपासून अभिलेखांचे संरक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देऊनच तिची निर्मीती केली आहे.
या इमारतीच्या अंतर्गत भव्य अशा सागवाणी लाकडी मांडण्यावर हे राष्ट्रीय जीवनात अत्यंत महत्वाचे असलेले अभिलेख विषयानुसार अभिलेख व्यवस्थापनाच्या ह्यष्टीने कापडी रुमालात बांधून अ ब क वर्गवारीनुसार ठेवण्यात आले आहेत. मांडणीच्या दर्शनी भागावर त्या दस्तावेजांची माहीती दिली आहे.
त्यावर किटक नाशक फवारणी , ठराविक काळानंतर फ्युमिगेशन, इत्यादिची काळजी अत्यंत दक्षतेने घेतली जाते.याखेरीज जीर्णशिर्ण झालेल्या अभिलेखांची बांधणी शाखेकडून दुरुस्ती करून अभिलेखांचे आयुष्य अधिक वर्षानुवर्ष टिकावे म्हणून पुराभिलेख. विभागाकडून काळजी घेण्यात येते.