
पुराभिलेख विभाग खाजगी किंवा शासकीय कार्यालयातील अभिलेख कसे संपादित करतात….
प्रथम शासकीय कार्यालयातून अभिलेख कसे पुराभिलेख विभागात जमा करून घेतले जातात त्याची माहीती आपण येथे घेऊ. काही तहसील कार्यालयात संस्थानील रेकॉर्ड जमा झालेला असतो आणि हे रेकॉर्ड बहुतेक मोडीलिपीतील किंवा इंग्रजी भाषेतील असतो.आणि हे अभिलेख ऐतिहासिक ह्यष्टीकोनातून महत्वाचे असल्याने संबंधित तहसील कार्यालयाच्या दैनंदिन कामाशी संबंधित नसल्याने त्याकागदपत्राचा इतिहास लिहीण्यासाठी उपयुक्त ठरतात अशा रेकॉर्डची यादी तयार करून मा. जिल्ह्याधिकारी यांच्याकडे रेकॉर्ड पुराभिलेख विभागाकडे हस्तातर करण्याची परवानगि मागितली जाते ती मंजूर झाल्यानंतर हा रेकॉर्ड पुराभिलेख विभागांच्या मुख्यालयात आणला जातो.पश्चिम महाराष्ट्रातील रेकॉर्ड एकतर पुणे पुराभिलेखागारात किंवा कोल्हापूर जवळील असेल तर तेथे ठेवण्यात येते. याच पध्दतीने मराठवाडय़ातील रेकॉर्ड औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर मध्ये तर विदर्भातील रेकॉर्ड नागपूर येथे ठेवण्यात आला आहे.शासकीय कार्यालयातील अभिलेख हस्तांतरित होण्यास फारशी अडचण येत नाही.मी अलिबाग येथून सरखेल कान्होजी आंग्रेचा रेकॉर्ड, मुरूड येथून जंजिरा संस्थानील रेकॉर्ड, सिंधुदुर्गातून सांवतवाडी संस्थानील रेकॉर्ड जमा करून घेतला. या अभिलेखातूनही काही अप्रकाशित इतिहासावर प्रकाशझोत टाकण्यास मदत झाली आहे.
खरी कसोटी लागते ती खाजगी व्यक्ती, संस्था, संस्थानीक, थोर नेत्यांचे कुटुंबिय या सर्वांवर विश्वास संपादन करून हा रेकॉर्ड कशा प्रका रे ठेवण्यात येणार आहे आणि त्या रेकॉर्डची मालकी ज्यांच्याकडून घेण्यात येणार आहे त्यांच्या नावे स्वतंत्रपणे ठेवण्यात येतो. त्यांना हवा तेव्हा तो उपलब्ध करून दिला जातो. इतकेच नव्हेतर ज्यांना आपल्याकडील अभिलेखांचा मोबदला हवा असेल तर त्या अभिलेखांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याची किंमत ठरविली जाते आणि ती रक्कम अदा केली जाते. शेवटी आम्ही पुराभिलेख विभागाचे अधिकारी अशा सन्माननीय अभिलेख धारकांना हे समजावून सांगतो कि काळाच्या ओघात हे अभिलेखांची नीट देखभाल झाली नाहीत तर नष्ट होतील त्यापेक्षा सरकारी दप्तरखान्यात ठेवलेत तुमच्या घराण्याचा उज्ज्वल इतिहास याच कागदपत्रांद्वारेच उजेडात येईल.हे एकाच बैठकीत होत नाही त्यासाठी खूप चिकाटी, संयम ठेवावा लागतो.
पाटणच्या सरदार पाटणकर दप्तरखान्यातून छत्रपती शिवरायांचे हस्ताक्षर असलेले 1678 सालचे पत्र मिळाले.त्यापत्रातील आशयावर एक स्वतंत्र शोध निबंध होईल. सोलापूरचे डाॅ.कोटणीस यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी महत्त्वाची कागदपत्रे मी अत्यंत चिकाटीने मिळवून ती रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रशस्त हाॅल मध्ये प्रदर्शित केली होती. अरूण टिकेकरांनी त्यांच्या टिकेकर कुटुंबियांकडील कागदपत्रे छोटेखानी संभारभात पुराभिलेख कार्यालयात दिली होती.थोर स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची कागदपत्रे त्यांचे चिरंजीव आमदार वामनराव बापट यांनी सुपूर्द केली होती.तशी ही यादी खूपच लांबलचक होईल.काही वानगीदाखल येथे काही नांवाचा उल्लेख केला आहे.
याच अभिलेखांच्या अभ्यासानंतर इतिहासातील तुटके दुवे जोडण्यास मदत झाली आहे.याशिवाय इतिहास संशोधकांना निरनिराळ्या घटनांचा सखोल अभ्यास करण्यास मदत झाली आहे.अजूनही असे अभिलेख कोणाकडे असतील तर या अभिलेखांचे राष्ट्रीय जीवनात असलेले महत्त्व लक्षात घेऊन ते पुराभिलेख विभागात जमा करावेत अशी नम्र विनंती आहे.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन मोबाईल 835 595 7451












