
ऑस्ट्रेलियन जीवन शैलीची थोडक्यात माहिती द्यावीशी वाटते. सिडनी आणि मेलबर्न ही दोन महानगरे आहेत. आणि ऑस्ट्रेलियन कला व संस्कृतीचे ही दोन्ही महानगरे माहेरघर आहेत. याची प्रचिती आपणांस सर्वत्र मिळते. या शहरातून क्रिडा विषयक तसेच अनेक मनोरंजनाचे केंद्र उपलब्ध असतात. सतत सांस्कृतिक कार्यक्रमाचे, महोत्सवाचे आयोजन जागतिक स्तरावर केले जात असतात.

ऑस्ट्रेलियन जीवन शैली ही उदारमतवादी असून ती नावीन्यपूर्ण उपक्रमाचेही स्वागत करीत असते. तिचा बेस हा विविधपुर्ण बहुसांस्कृतिक त्याचबरोबर लोकशाहीचा स्विकार केला आहे. उबदार हवामानात मित्र मंडळींबरोबर बार्बेक्यूजची मजा घेत गप्पा गोष्टीची मैफिल जमविणे हा आवडीचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा विषय असतो. त्याप्रमाणे या ऑस्ट्रेलियन लोकांसाठी खेळ हा विषय सर्वाधिक लोकप्रिय, आणि आवडीचा विषय असतो. स्वदेशातील ऑस्ट्रेलियन नियम फुटबाॅल, किक्रेट, रग्बी, आणि टेनिस, स्पोर्टिग क्लब मध्ये सामील होऊन नवीन मित्र जोडण्याचा हा एक चांगलाच मार्ग आहे. येथे वर्षभर फूड फेस्टिवल, परदेशातील अनेक कलाकारांचे काॅन्सर्ट आयोजित करण्यात येतात. भारतातील गझल गायक जगजितसिंह, सोनू निगम, रवि शंकर, तबलावादक उत्साद झाकिर हुसैन यांचे अनेक कार्यक्रम होत असतात.
ऑस्ट्रेलियन लोक सर्व साधारणतः मैत्रीपूर्ण
स्वभावाचे असतात पण कधी कधी तेथे जातीयवादाची भीषणताही अनुभवास मिळते. या मागची नेमकी कारणे काय असतात हे समजून येत नाही. या मागचे मानसशास्त्र हा खरंच संशोधनाचा विषय झालेला आहे. याबाबत पर्यटकांनी स्थानिकांशी अधिक संभाषण करून त्यांच्याशी संवाद साधून मनं जिंकून घ्यावीत. मग ते अगदी मोकळेपणाने मदतीचा हात पुढे करतात.
प्रत्येक देशात पर्यटनावर अधिक लक्ष केंद्रीत केले जात असते. कारण त्यामुळेच आर्थिक उलाढालीत महत्वाची मदत होते. सिडनीतील ग्रेट ओशन रोड, काकडू राष्ट्रीय उद्यान, ब्लू माऊंटन नॅशनल पार्क, फ्रेझर बेट
येथे पर्यटक सर्वाधिक संख्येत भेट देतात.
भारतातून ऑस्ट्रेलियन पर्यटक व्हिसासाठी एकूण शुल्क AUD 190 ( अंदाजे भारतीय रूपये 10500 ) भरावे लागतात.( हे जुने रेट असून आता ते वाढलेही असतील. ) मात्र व्हिसा संदर्भातील आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास ही भरलेले शुल्क परत केले जात नाही. मी फावल्या वेळात अधिकची माहिती घेण्याचा सतत प्रयत्न करीतच होतो.

सिडनीतील ऑपेरा हाऊस हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्याविषयी थोडक्यात माहिती देत आहे. हे ऑपेरा हाऊस 20 . X. 1973 रोजी सर्वासाठी ओपन करण्यात आले. या ऑपेरा हाऊसला भेट दिल्याशिवाय ही टूर पुर्ण होतच नाही. प्रत्यक्षात त्या त्या ठिकाणची खाद्य संस्कृती किंवा वैशिष्ट्यपूर्ण माहिती तेथे जाऊनच तिचा आस्वाद घ्यायचा असतो हेच खरे. आणि म्हणूनच सिडनीतील ऑपेरा हाऊस हे त्यापैकीच एक आहे.
या ऑपेराहाऊसचे बांधकाम 1 मार्च 1959 सुरू झाले आणि ते पूर्णत्वास 20 ऑक्टोबर 1973 साल उजाडले. या वास्तुची खासियत म्हणजे एकाच छताखाली नृत्य, संगीत, नाट्यविष्कार, ध्वनीमुद्रण, सिडनी सिंफनी अशा एक ना अनेक अत्याधुनिक सुसज्ज कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.
या वास्तुचे मालकी हक्क न्यु साऊथ वेल्सच्या सरकारच्या अधिन आहेत. या वास्तुचे वास्तुविशारद डॅनीश जर्न उत्झान असून त्यांच्या कल्पनाविलासातून ती साकारली आहे. या वास्तुचे दर्शन आपल्या बाॅलीवूडच्या चित्रपटातून आपणांस होत असतो. वीसाव्या शतकातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक इमारती मध्ये तिचा अंतर्भूत होतो.

आज मेलबर्न सिटीची आमच्या ट्रीपच्या शेड्युल प्रमाणे भेट ठरलेली होतीच. मेलबर्न ही ऑस्ट्रेलियाची महत्त्वाची सिटी आहे हे सर्वज्ञात आहे. तिला ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. आमच्या टूरची सुरुवात तर छानच झाली होती. सर्वानी वेळेवर उपस्थित राहावे हे वारंवार सांगूनही काहीजण उशीरानेच येत होते आणि हा अनुभव प्रत्येक टूर मध्ये येतच असतो. पुन्हा सुचनांची उजळणी, बसमध्ये स्थानापन्न झाल्यावर गणपतीचा उद्घोष करून प्रार्थना. आता ही क्रमवारी टूर संपेपर्यंत अशीच चालणार होती.
प्रथम आम्ही सेंट पॅट्रीक कथेड्रेल येथे भेट दिली. आमच्या टूर गाईडने त्याचे महत्व विशद केले. त्यातील बरीचशी माहिती डोक्यावरून जात होती हा भाग वेगळा. पण अशावेळी आपणांस सर्व काही समजले आहे असाच भाव चेहर्यावर आणावयाचा असतो. त्यानंतर टाऊन हॉल. प्रत्येक शहराचा टाऊन हॉल हा
मानबिंदू असतो. ते भव्य टाऊन हॉल पाहिल्यावर मला आपल्या मुंबईच्या भव्य दिव्य ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले टाऊन हॉलचे स्मरण झाले तसेच कोलकत्ताचा टाऊन हॉलही आठवला.
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न व्हिक्टरोरियन संसद भवनात आमची पुढील भेट ठरल्याप्रमाणेच झाली. आमचा टूर गाईड रस्त्याच्या डाव्या बाजूस हे पहा म्हणत होता आणि लगेचच उजव्या बाजूस ते पहाची सुचना देतही होता. आम्हाला मात्र हा डाव्या, उजव्या बाजूचा व्यायाम करणे अवघड जात होते. इतक्यात पार्लमेंट हाऊस जवळ आम्ही पोचलो. येथली पार्लमेंट हाऊस ही तात्पुरती व्यवस्था होती. पुढे वेनबरा येथे सुनियोजित राजधानी निर्माण केली त्याची माहिती स्वतंत्र देणार आहेच.
आमच्या गाईडनी तेथल्या संसदीय रचनेची, निवडणूक पध्दतीची, माहिती दिली. पुर्वी तांत्रिक हृषीकोनातून ऑस्ट्रेलियातील राष्ट्रांची प्रमुख इंग्लंडची राणी होती पण आता राणी नसल्याने राजा फिलीप चार्ल्स कॅनडा व अन्य ब्रिटिश अधिपत्यातून स्वतंत्र झालेल्या देशांचा नाममात्र तोच प्रमुख आहे.
या ऑस्ट्रेलियन लोकांनी आजही हीच राजकीय प्रणाली सुरू ठेवण्यात आली आहे. त्यानंतर व्हिक्टोरिया पध्दतीनुसार निर्माण केलेले फित्झोरी गार्डनमधली हरितभरी वृक्षराजी काय, किती पहावे असे झाले होते. प्रत्येक ठिकाणी घेतलेली मेहनत, काळजी दिसून येत होती.त्याला जोडूनच लगेचच विशाल असा निळाशार ऑरनामेंटल लेक, पॅव्हलिन, मनाला आनंद देणारा फाऊंटन, तेथील अप्रतिम शिल्पकला पाहून कलासक्त आवडी निवडीला दाद द्यावीच लागली. नजरेतून सर्व टिपत होतोच, त्याचबरोबर मोबाईलच्या कॅमेर्यातही ते बंदिस्त करीत होतो. पर्यटक आकर्षित का होतात हे समजून येत होते.
येथील गार्डन पाहात असतानाच एक जबरदस्त आकर्षण होते ते ज्या जेम्स कुकने अठराव्या शतकात ऑस्ट्रेलियाचा शोध लावून जगाच्या नकाशावर आणले त्याचे एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त करणारे स्मारकच उभारले ऑस्टेलियात असावे या भावनेतून त्याचे इंग्लंड मधील घरच जसेच तसे शिप्ट करून आणून त्याची पुर्ननिर्माण केले आहे. त्याच्या बालपणापासून ते कॅप्टन कुक पर्यंतचा इतिहास काॅटेजमधून आपणांस समजतो.
विशेष म्हणजे कॅप्टन कुकचे हे घर जसे होते त्याच स्वरूपात इंग्लंडहून तसेच बोटीने आणून त्याची स्केचेस प्रमाणे पुर्ननिर्मीती करण्यात आली आहे. अतिशय चांगल्यारितीने सादरीकरण करण्यात आले आहे. तेथील बागेत विवीध फुलांचे ताटवे वर्षभर फुलत असतात.

दुपारच्या लंच नंतर पुन्हा आमची साईटसिंग सुरू झाली. मेलबर्नची ऐतिहासिक सिटी सर्कल ट्राम, जी आम जनतेससाठी ये जा करण्यास विनामूल्य असते. आम्हीही त्याचा आनंद घेतला. सेंट्रल मेलबर्न डाॅकलॅड, मेलबर्न संग्रहालय, आणि प्रिन्सेस थिएटर इत्यादी पाहताना आमची खूप दमछाक झाली.
खरेतर एका दिवसात हे सारे पहायचे कठीणच होते. टूर इनचार्ज कागदावरील आयटरी पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होता. त्याला त्याचे टाईम टेबल सांभाळून घ्यायचे होते.
आजच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला आपल्याकडील आर्ट गॅलरीप्रमाणे जेथे विवीध प्रदर्शने भरविण्यात येतात ते चहापानानतंर The Atrium, a magnificent galleria दाखविण्यात आली. ती खूपच आकर्षक होती.

पुढे फिलीप आयर्लंडवरील लिटिल पेग्विगनचे नैसर्गिक अधिनिवासस्थाना बरोबर इतर वाईल्ड प्राणी इत्यादीचे दर्शन घडविले. यासाठी आम्ही तीन तासांचे ड्राईव्ह करून गेलो. येथे आम्ही प्रथम बर्गर, काॅफीपान करून घेतले. येथे हवा एकदम विंडी होती. अत्यंत बोचर्या हवामानात आणखीन पाऊस पडू लागल्यावर खूपच त्रास होऊ लागला. मी दूडू दूडू धावणारे पेग्वीन पाहून सुरक्षित शेल्टरमध्ये बग्गीने आलो. यथावकाश सर्वच सहप्रवासी आल्यावर आम्ही रात्री बरोबर बारावाजता हाॅटेलात आलो.
प्रत्येक ठिकाणची माहिती गाईड देतच होते. माझ्यासारख्या प्राचीन इतिहासातात, वस्तु आणि वास्तुत स्वारस्य असणाऱ्यानी स्वतंत्रच सावकाशीने अवलोकन करायला पाहिजे. येथील प्रत्येक स्थळ एक सविस्तर लेखाचा विषय आहे. पाहूया भविष्यात
पुन्हा संधी मिळाली तर मी अधिकचे नक्कीच लिहीयला आवडेल.
आज खूपच दमछाक झाली होती. आता समान आवडी निवडीचे ग्रुपही आपोआप तयार झाले होते. टूरवर ठराविक भारतीय रेस्टॉरंट मध्ये डिनर घेऊनच हाॅटेलमध्ये परतावे लागत असते. येथील हॉटेल लवकरच बंद होतात त्यामुळे घाईघाईत भोजन कार्यक्रम आयोजित करून तो पारही पडत होता. इतका समंजस माहोल तयार झाला होता. शेवटी आमची टुरिस्ट बस हाॅटेल वर पोचल्यावर मी लागलीच दिवसभराचे टिपण आणि माझी सखी दैनंदिनी अपडेट करूनच मी झोपी जात होतो.











