
स्वच्छ सर्वेक्षण झाल्याने प्रत्येक विभागात आधिकारी, कर्मचारी आता काहीसे निवांत झाले आहेत. याचा फायदा घेऊन फेरीवाले मात्र सुसाट झाले आहेत. महानगरपालिकेच्या घणसोली, कोपरखैरणे आणि ऐरोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. वाहतुकीच्या रस्त्याच्या मुख्य वळणावर अनेक ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करीत असल्यामुळे प्रवाशांसह पादचाऱ्यांना येथून येणे-जाणे फार जिकरीचे होत आहे. अशा फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी आणि फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली लावावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
घणसोली दर्गा, सेक्टर १, डी मार्ट परिसर, बालाजी आंबो पाटील महापालिका शाळेपासून हनुमान मंदिर ते सद्गुरू रुग्णालयापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा या फेरीवाल्यांची एकच गर्दी असते. घणसोली रेल्वे स्थानक परिसर, सदगुरू रुग्णालय, नाळा साई सदानंद नगर, सेक्टर ७ येथील महापालिकेच्या शाळेसमोरील मैदानाजवळ ५० ते ६० अनधिकृत फेरीवाल्यांनी भाजी आणि मासळी बाजारच थाटला आहे. सरपंच दगडू चाहू पाटील चौकाला तर या फेरीवाल्यांनी अक्षरश: वेढा घातलेला आहे. तसेच हावरे चौकाजवळसुद्धा हीच परिस्थिती कायम आहे. त्यापुढे रबाळे रेल्वे पादचारी भुयारी मार्गाजवळ फळे, भाजी आणि वडापावच्या हातगाड्या बिनधास्त लावल्या जात आहेत. ऐरोली रेल्वे स्थानक, ऐरोली नाका ते ऐरोली गाव, ऐरोली डी मार्टशेजारी सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर फेरीवाल्यांनी भाजीपाला बाजार तयार केला आहे. सेक्टर ५ येथील दत्तमंदिर परिसरात सायंकाळी फेरीवाल्यांची फार वर्दळ असते. कोपरखैरणे येथे पोलिस ठाण्याच्या दिशेने अण्णासाहेब पाटील उद्यानाकडे जाणाऱ्या सेक्टर ५ आणि ७च्या रस्त्यावर सायंकाळी फेरीवाल्यांची गर्दी असते. त्यामुळे येथून चालणे कठीण होत आहे. गुलाबसन्स डेरीजवळील मुख्य रस्त्यावर भाजी मार्केटच्या बाहेर अनेक फेरीवाले असतात. कोपरखैरणे गावात शिवसेना शाखा ते हनुमान मंदिर परिसरात सायंकाळी फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मागे शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने फेरीवाल्यांना कुठेही बसू दिले जात नव्हते. त्यामुळे बराचसा भाग फेरीवालामुक्त झाला होता. मात्र आता परत फेरीवाल्यांनी रस्त्यावर कब्जा करायला सुरुवात केली आहे.








