नासाने जारी केला पृथ्वीचा सर्वात दुरून काढलेला फोटो

खगोलीय भाषेत त्याला ‘Pale Blue Dot’ असं म्हणतात. वोएजर-1 या अंतराळयानाने पृथ्वीपासून तब्बल 6 अब्ज किमी अंतरावरून मागे वळून हे छायाचित्र टिपलं होतं. या घटनेला काल 14 फेब्रुवारी रोजी 30 वर्षं पूर्ण झाली आहेत.

यानिमित्ताने नासाने 30 वर्षं जुन्या या छायाचित्रावर आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून पुनर्प्रक्रिया करून अधिक स्पष्ट प्रत जारी केली आहे.

मूळ छायाचित्राचा मान राखत ही प्रक्रिया केल्याचं नासाने म्हटलं आहे.

चित्रात पृथ्वी अजूनही विशाल अंतराळात एकमेव, चमकदार निळा ठिपका असल्याचं दिसतं, आणि नवीन छायाचित्रातही या ठिपक्यावर सूर्यप्रकाश पडलेला दिसतो. फरक एवढाच की नवीन छायाचित्र अधिक ‘स्वच्छ’ आहे आणि त्यात पृथ्वी चटकन ओळखता येते.

वोएजर-1 या अंतराळ यानाने अवकाशात काही फोटो काढले आणि त्यानंतर यानातील ऊर्जेची बचत करण्यासाठी त्याचा कॅमेरा बंद करण्यात आला. जेव्हा कॅमेरा बंद करण्याची कमांड देण्यात आली तेव्हा शेवटी काढलेल्या काही फोटोंमध्ये पृथ्वीचं हे छायाचित्र हाती आलं होतं.

Source: BBC MARATHI