
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विषाणू प्रयोगशाळेचे ऑनलाईन उद्घाटन केले. रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक सुविधेत वाढ झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये अशा स्वरुपाची प्रयोगशाळा उभारण्यास मंजूरी मुख्यमंत्र्यांनी दिली, अवघ्या १४ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. गतिमान पध्दतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.

ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि आज मुख्यमंत्री आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.
यापुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल. याचा जिल्ह्यातील सर्वांना फायदा होणार आहे. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा ते देखील करु, असे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रयोग शाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी सांगितले.
लॉकडाऊन सुरु झाला त्याचा उपयोग आरोग्य सुविधांची वाढ करण्यासाठी करावा हे धोरण ठेवून राज्यात काम सुरु आहे. कोविड-१९ चे संकट सुरु झाले त्यावेळी राज्यात २ प्रयोगशाळा होत्या आता ही संख्या ८५ झाली आहे. संकटाचे रुपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
नागरिकांना तपासणीसाठी फार दूर जावे लागणार नाही यासाठी सुविधा निर्माण करताना त्या तपासणीचे दर देखील त्यांच्या आवाक्यात आणणे हे सरकारचे यापुढील काम असेल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.










