
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) दुपारी 4 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. एकीकडे देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला होता. यात त्यांनी कोरोना, टोळधाड आणि लडाखमध्ये वीरमरण आलेल्या जवानांविषयी भाष्य केले होते. यात त्यांनी चीनचे नाव न घेता, भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला योग्य उत्तर जवानांनी दिले, असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगात सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशाच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. देशात 5 लाख 48 हजार 318 हून अधिक रुग्ण आहेत. यात 16 हजार 475 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारत-चीन यामध्ये सीमारेषावरुन तणाव कायम आहे. सोमवारी भारत सरकारने 59 चीनी अॅपवर बंदी घातली आहे. या सर्व घटनाच्या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.











